भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी “ते खड्डेमुक्त शहराची चर्चा करत आहेत, तर संपूर्ण देश काँग्रेसमुक्त देशाची चर्चा करत आहे,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

मिरा भाईंदर शहरात पावसानंतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने नागरिकांकडून सत्ताधारी भाजपवर टीका होत आहे. काँग्रेसनेही या प्रश्नावर आंदोलन छेडले असून, खड्ड्यांच्या समस्येबाबत आमदार नरेंद्र मेहता यांना वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मेहता यांनी शहरातील खड्ड्यांच्या समस्येची जबाबदारी स्वीकारत परिस्थितीमागील कारणे स्पष्ट केली. मार्च महिन्यात मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पावसाळ्यापूर्वीच विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीसह खड्डे भरण्याची महत्त्वाची कामे प्रशासनाला वेळेत करता आली नाहीत, असे त्यांनी सांगितले.

मेहता यांनी दावा केला की, शहरातील सुमारे ७५ टक्के रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या यापूर्वीच सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारून कायमस्वरूपी सोडविण्यात आली आहे. उर्वरित रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठीही आवश्यक निर्णय घेण्यात आला असून लवकरच कामे पूर्ण केली जातील, असे ते म्हणाले. याचवेळी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करताना मेहता म्हणाले,”काँग्रेस खड्डेमुक्त शहराची भाषा करत असली, तरी देशभरात काँग्रेसमुक्त भारताचीच चर्चा सुरू आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.