भाईंदर :- मिरा-भाईंदर शहराचे आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वादादरम्यान आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांचा “माझे ड्रायव्हर” असा उल्लेख केला आहे. यामुळे सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक संतप्त झाले असून त्यांनी याबाबत मेहता यांना जाहीर पत्र लिहून सावध राहण्याचा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आता मेहता विरुद्ध पूर्वेश सरनाईक असा नवा वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मिरा-भाईंदर शहरातील भाजप आणि शिवसेनेचे आमदार नरेंद्र मेहता व प्रताप सरनाईक यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून वाद सुरू आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती असतानाही हे दोन्ही नेते स्थानिक पातळीवर वेळोवेळी एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसून येते.दरम्यान, नुकत्याच झालेल्या मेट्रो लोकार्पण सोहळ्यात मिरा-भाईंदर शहरातील ३० टक्के जागा नरेंद्र मेहता यांच्या नावावर असल्याचा उल्लेख मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केला होता.

सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यामुळे संतप्त झालेल्या मेहता यांनी एका मुलाखतीत सरनाईक यांच्यावर रोष व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “जर मिरा-भाईंदर शहरातील ३०टक्के जागा माझ्या नावावर असत्या, तर प्रताप सरनाईक माझ्या बरोबरीचे काय, माझ्या खाली उभे राहण्यासही पात्र नसते.”इतकेच नव्हे, तर “प्रताप सरनाईक हे माझे ड्रायव्हर होते,” असा दावाही त्यांनी केला.

हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी नरेंद्र मेहता यांना जाहीर पत्र लिहून राजकारणातील मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला. तसेच, “सरनाईक कुटुंब या मर्यादांचे पालन करत आले आहे. जर आम्ही त्या मर्यादा सोडल्या असत्या, तर तुमच्या ‘इनसाइड द टॉवेल’ मधील सर्व किस्से उघड करण्याची संधी आमच्याकडे होती; मात्र आम्ही तसे केले नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे येत्या काळात प्रताप सरनाईक विरुद्ध नरेंद्र मेहता असा सुरू असलेला वाद आता नरेंद्र मेहता विरुद्ध पूर्वेश सरनाईक असा रंग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.