मिरा रोड : जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर मिरा रोड पूर्वेतील भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेवेन स्क्वेअर अकॅडमी शाळेत विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पालकांच्या व्हॉट्सॲप समूहावर संदेश पाठविण्यात आला असून, पर्युषण काळात शाळेच्या कॅन्टीनमध्येही कांदा, लसूण आणि बटाटा न वापरता खाद्यपदार्थ देण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
मिरा भाईंदर शहरात जैन समाजाच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे पर्युषण काळात पालिकेकडून दोन दिवस मांस विक्रीवर बंदी करण्यात आली आहे.यात मिरा रोड येथे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबीयांची सेवेन स्क्वेअर अकॅडमी ही शाळा आहे.दरम्यान या शाळेत पर्युषण काळात प्राणीहिंसा टाळण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या डब्यात कंदमूळ पदार्थ आणू नयेत, अशी पालकांना विनंती करण्यात आली आहे.

या आवाहनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आहाराचा विषय चर्चेत आला आहे.शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सॲप समूहावर पाठविण्यात आलेल्या संदेशात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे पदार्थ डब्यात न आणण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच या कालावधीत शाळेच्या कॅन्टीनमध्येही त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आमदार नरेंद्र मेहता यांनी शाळेकडून कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. पर्युषण हा पवित्र काळ असून, या काळात पशू आणि प्राण्यांवर अन्याय होऊ नये तसेच प्राणीहिंसा टाळावी, या उद्देशाने पालकांना केवळ विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
