वसई: बहुचर्चित असलेला नारिंगी उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळला आहे. असे जरी असले तरी नारिंगी गावातील नागरिकांना ये जा करण्यासाठी दुसरा मार्ग उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होणार आहेत. यासाठी या नारिंगी फाटकावर पादचारीपूल किंवा भुयारी मार्ग तयार करावा अशी मागणी पुढे आली आहे.
विरार येथे नारिंगी गाव आहे. याच गावातून मध्य भागातून विरार डहाणू रेल्वे वाहिनी गेली असल्याने या ठिकाणी रेल्वे फाटक क्रमांक ४१ तयार केले होते. मात्र सतत फाटक बंद होत असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यासाठी गेल्या या ठिकाणी उड्डाणपूल तयार व्हावा अशी केली जात होती.
याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा ते सात वर्षांपूर्वी विरार नारिंगी रेल्वे फाटक क्रमांक ४१ वर नारिंगी उड्डाणपुलाचे काम हाती घेतले होते. तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पाला विलंब झाला; मात्र आता सर्व अडथळे पार करून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. याशिवाय पूल खुला झाल्याने रेल्वेचे फाटक ही आता बंद होणार आहे.
उड्डाणपुलामुळे जरी नागरिकांना जरी मोठा दिलासा मिळाला असला तरी नारिंगी गावातील राहिवासीयांना ये जा करण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. यासाठी त्यांना मार्ग उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे.
यासाठी या ठिकाणी पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी महापौर अजीव पाटील यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली.
त्याला उत्तर देताना याचाही सकारात्मक पणे विचार केला जाईल असे नाईक यांनी सांगितले. त्यासोबत खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी ही पादचारी पूल किंवा भुयारी मार्गाचा प्रश्न आहे याबाबत रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढला जाईल या कामासाठी लागणारा निधी आहे तो जिल्हा नियोजन व महापालिका यांच्या मार्फत उभा करता येईल असे सवरा यांनी सांगितले.
