scorecardresearch

नैसर्गिक नाले गायब; विरार शहरात जलसंकटाचा धोका आणखी तीव्र

विरार शहरातील पाणी वाहून नेणारा एक नैसर्गिक नाला गायब झाला असून अन्य दोन नाल्याचीं रुंदी देखील कमी झाली आहे

वसई: विरार शहरातील पाणी वाहून नेणारा एक नैसर्गिक नाला गायब झाला असून अन्य दोन नाल्याचीं रुंदी देखील कमी झाली आहे. यामुळे शहरातील पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले असून पावसात शहरातील गेल्या संकटाचा धोका आणखीनच वाढला आहे.
गेल्या काही वर्षांपासून विरार शहर जलमय होऊ लागले आहे. विरार पश्चिमेकडील विवा महाविद्यलय परिसर, डोंगरपाडा परिसर पाण्याखाली जाऊ लागले आहे. डोंगरपाडा परिसरातील घराघरांत पाणी शिरू लागले आहे. शहरातून पाणी वाहून जाणारे नैसर्गिक नाले बुजविण्यात येत असल्याने शहर जलमय होण्याची समस्या निर्माण झाल्याचे उघड झाले आहे.
पावसात शहर जलमय होऊ लागल्याने आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी असलेले नाले आता शिल्लक राहिले नाही. त्यामुळे आम्ही पालिकेकडे या नाल्याबाबत माहिती मागवली असता, नाला आता अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याचे डोंगर पाडा येथील स्थानिक रहिवासी जीतेश राऊत यांनी सांगितले. या परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणावर विकास कामे होत असून दुसरीकडे नाले बुजवले जात आहे त्याचा मोठा फटका शहरातील नागरिकांना बसत असल्याचेही ते म्हणाले या भागात नैसर्गिक नाले होते ते बुजवण्यात आले आहेत पालिकेने या नैसर्गिक नाल्यांचे संवर्धन करणे किंवा ते नव्याने बांधण्याची गरज होती. मात्र तसे न करता पालिकेने या भागात उंच रस्ता बांधला आहे ज्यामुळे पावसाळ्यामध्ये समस्येत आणखीनच भर पडणार असल्याचे भीती स्थानिकानी व्यक्त केली आहे.
नैसर्गिक नाले बुजवणे हे मोठे पाप असल्याची प्रतिक्रिया शिरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी दिली. निरीच्या अहवालात नाले बुजवले जात असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता नाले बुडवणाऱ्या भू माफियांवर कारवाई करण्याची गरज आहे तसेच पाणी वाहून जाण्यासाठी नवीन नाले तयार करावे अशी मागणी त्यांनी केली.
बांधकामात नाला गडप
रुस्तमजी शाळेच्या मागे (रेल्वे कल्वर्ट क्र. ८६ ते आदर्श शाळा ) येथे ११६० मीटर लांब आणि २५ मीटर रुंद नाला होता. हा नाला गायब झाला आहे. या ठिकाणी एवढे बांधकाम झाले आहे की कधीकाळी येथे नाला होता त्याच्या खाणाखुणाच नष्ट झाल्या आहेत. डोंगरपाडा येथे मग्नर्स मोटर ते पॅरामाउंट अग्रवालपर्यंत ५९० मीटर लांब आणि मीटर १३ रुंद नाला होता. त्याची रुंदी आता अवघी ४.१० मीटर एवढी झाली आहे. रेल्वे कल्व्हर्ट ८६ येथे मोदी हुंडाई शोरूमजवळ एक नाला होता. त्याची रुंदीदेखील अवघी ४ मीटर एवढी झाली आहे. एक नाला गायब झाल्याचे तसेच अन्य दोन नाल्यांची रुंदी कमी झाल्याची माहिती खुद्द पालिकेने माहिती अधिकारात दिली आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Natural streams disappear danger water crisis virar city severe amy

ताज्या बातम्या