भाईंदर: विमान प्रवासाचा वाढता खर्च, मुंबई विमानतळावरील प्रचंड गर्दी आणि सहज उपलब्ध होणारी तिकिटे यामुळे आता प्रवासी मुंबईतील जुन्या विमानतळाऐवजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पर्याय अधिक प्रमाणात निवडू लागले आहेत. विशेषतः ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये तुलनेने कमी दर मिळत असल्याने मध्यमवर्गीय प्रवाशांचा कल नव्या विमानतळाकडे वाढताना दिसत आहे.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक मार्गांवरील उड्डाणांवर ताण निर्माण होत आहे. याउलट नवी मुंबई येथे नव्याने झालेल्या विमान तळावर तुलनेने कमी गर्दी असल्याने अनेक विमान कंपन्यांकडून आकर्षक दरात तिकिटे उपलब्ध करून दिली जात आहेत.त्यामुळे गोवा,उत्तर प्रदेश,बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद यांसारख्या शहरांसाठी प्रवासी नवी मुंबई विमानतळाचा वापर करू लागले आहेत.महत्वाची बाब म्हणजे यात मुंबईकरांचा देखील समावेश आहे.

यात ऑनलाईन बुकिंगमध्ये काही मार्गांवर प्रत्येकी ५०० ते २५०० रुपयांपर्यंत फरक दिसून येत आहे. सुट्टीच्या हंगामात हा फरक आणखी वाढत असल्याचा दावा केला जात आहे.विशेष म्हणजे, कमी गर्दीमुळे चेक-इन व सुरक्षा तपासणीसाठी लागणारा वेळही कमी लागत असल्याने अनेक जण सोयीसाठीही नवीमुंबई विमानतळाला पसंती देत आहेत.

मात्र १ जून पासून प्रवास महागणार

भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील देशांतर्गत-आंतरराष्ट्रीय मार्गावरील प्रवाशांसाठी अनुक्रमे ६२० आणि १,२२५ रुपये वापरकर्ता विकास शुल्क निश्चित केले आहे. येत्या १ जूनपासून नवीन शुल्क लागू होणार आहे. मुंबई विमानतळाच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरील शुल्क ३.५ पट अधिक असल्याने एकूण प्रवास महागणार आहे.

“मी नुकतेच उत्तर प्रदेश मधून मुंबईला आलो.यंदा मुंबई च्या तुलनेत नवी मुंबईला उतरणाऱ्या विमानामध्ये मला तिकीट मागे आठशे रुपया पर्यंत फरक जाणवला. त्यामुळे कुटुंब मोठे असल्यामुळे मी तोच पर्याय स्वीकाररून नंतर गाडीने मिरा रोडला आलो “

  • आशिष पांडे – प्रवासी

“घोडबंदर मार्गे नवी मुंबईला जाने वाहतूक दुष्ट्या कठीण आहे.मात्र तेथून मिळणारी सवलत, आणि इतर गोष्टी पाहता आता आता नवी मुंबई वरून प्रवास करण्याचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.”

  • पंकज पाटील – प्रवासी