वसई: ऑक्टोबर महिन्यापासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे कार्ड काढण्यासाठी वसई विरार मधील बस आगारात प्रवाशांची गर्दी जमू लागली आहे. मात्र, वसई आणि नालासोपारा बस आगारातील सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना विरारमधील बस आगार गाठावे लागत आहेत. यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे वेळ व पैसा वाया जात असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाकडून सवलतधारकांसाठी ( नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी सुरू आहे.तसेच १ ऑक्टोबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिला व आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वसई-विरार परिसरातील बस साधारण मध्ये कार्डासाठी अर्ज करण्यासाठी प्रवास गर्दी करत आहेत.
एनसीएमसी कार्डची नोंदणी व वाटप करण्यासाठी इबिक्स कॅश या कंपनीकडून बसा आगारात एजंट नियुक्ती केले जात आहेत. तीन महिन्यांपूर्वी वसई बस आगारात एनसीएमसी कार्डची नोंदणी करणाऱ्या एजंटविरोधात प्रवाशांनी तक्रार केल्यामुळे एजंटकडून काम काढून घेण्यात आले. त्यामुळे वसईतील प्रवाशांना नालासोपारा आणि विरार बस आगारात धाव घ्यावी लागत होती. तर सप्टेंबर महिन्यात नालासोपारा बस आगारातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. कार्डाची नोंदणी करणाऱ्या एजंटने प्रवाशांशी वाद घातल्याच्या तसेच कार्डाची नोंदणी करण्यासाठी अतिरिक्त पैसे मागितल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नालासोपारा बस आगारातील एजंटचे कामही थांबवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे आता दोन्ही आगारातील प्रवाशांना विरार रेल्वे स्थानक तसेच अर्नाळा बस आगारात अर्ज करावे लागत आहेत. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतरही सर्व्हर संथ गतीने चालत असल्याने किंवा अचानक मशीन बंद पडत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. कित्येक ज्येष्ठ नागरिकांना उन्हात आणि रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया संदेश घोलप यांनी दिली. तसेच वसई, नालासोपारा याव्यतिरिक्त सफाळे बस आगारातही समस्या उद्भवल्यामुळे त्या बस आकारातील प्रवासी देखील विरारला येत असल्याने अर्नाळा बस आगारात मोठी गर्दी जमत आहे. तसेच यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याबाबत अर्नाळा अगर व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, आगारात जितके प्रवासी येतात त्यांची नोंदणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, असे त्यांनी सांगितले. तर नालासोपारा व वसई बस आगारात नवे एजंट नियुक्त करावेत, यासाठी निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित आगाराच्या आगार व्यवस्थापकांनी दिली.
