वसई: नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिक आणि पर्यटकांची माहिती गोळा करण्यास महाराष्ट्र सरकारने सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर, वसई विरार शहरातील नागरिक या पुरामुळे बेपत्ता झाले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी राज्य शासनाने जारी केलेल्या हेल्पलाइनवर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाने केले आहे.

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात पूर आल्यामुळे या परिसरात मोठा हाहाकार उडाला आहे. या घटनेनंतर कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेले १०५ भारतीय नागरिक आणि ३७ अनिवासी भारतीयांसह (एनआरआय) जवळपास ४०० भाविकांचा संपर्क तुटला आहे. या बेपत्ता नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश असण्याचीही शक्यता आहे.

त्यामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी आणि मदत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक ऑनलाईन लिंक व क्रमांक जारी केली आहे.वसई विरार व मीरा-भाईंदर शहरातील नागरिक, पर्यटक तसेच तेथील नातेवाईकांशी संपर्क साधू न शकलेल्या कुटुंबांनी महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाकडून जारी करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर आपले नाव नोंदवावे, असे आवाहन मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

या पोर्टलद्वारे नोंदणी करणारे अडकलेल्या व्यक्तीचे नाव, पासपोर्ट क्रमांक, मोबाईल किंवा व्हॉट्सॲप क्रमांक, महाराष्ट्रातील पत्ता आणि जिल्हा, आपत्कालीन संपर्क तपशील, सध्याचा देश आणि शहर, सध्याचा पत्ता, जीपीएस लोकेशन आणि व्हिसा तपशील यासह माहिती देऊ शकतात.

या फॉर्ममध्ये अडकलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या लोकांची संख्या, सर्वात जवळचे विमानतळ आणि कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा तातडीच्या आरोग्यसेवेची आवश्यकता याबद्दलची माहिती देखील भरणे आवश्यक आहे.

कोठे संपर्क साधावा?

महाराष्ट्रातील कोणताही नागरिक नेपाळमध्ये अडकलेला असल्यास त्याची माहिती खालील लिंकवर नोंदवावी:

लिंक: https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

आपत्कालीन हेल्पलाईन: १०७० (टोल फ्री)

एसईओसी कंट्रोल रूम: ९३२१५८७१४३

ई-मेल: controlroom@maharashtra.gov.in