दोन वर्षांत नवीन धरण

बहुचर्चित खोलसापाडा धरणाच्या टप्पा क्रमांक २ च्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे.

खोलसापाडा धरणाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ

वसई : बहुचर्चित खोलसापाडा धरणाच्या टप्पा क्रमांक २ च्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. वसईत झालेल्या एका सोहळ्यात या कामाचे भूमीपूजन संपन्न झाले. खोलसापाडा धरण टप्पा क्रमांक २ मधून वसई विरार शहराला दररोज १५ दशलक्ष लिटर पाणी मिळणार असून येत्या दोन वर्षांंच्या आता हे पाणी नागरिकांच्या दारात येणार आहे.

वसई विरार शहराची लोकसंख्या २५ लाख झाली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित आराखडय़ात पुढील २० वर्षांत वसई विरार शहरातील लोकसंख्या ४५ लाख एवढी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने भविष्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पर्यायी स्रोत शोधणे सुरू केले होते. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेऊन पालिकेने खोलसापाडाची दोन्ही धरणे विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेने या धरणाच्या कामाला सप्टेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली होती. मात्र वनखात्याच्या परवानगीसह अनेक अडथळे येत होते. शासनदरबारी पाठपुरावा केल्यानंतर धरणाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले होते. नुकताच एका कार्यक्रमात या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन आमदार क्षितिज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांच्य हस्ते करण्यात आले.

खोलसापाडा पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एकूण दोन धरणे आहेत. त्यापेकी धरण १ मधून ५० तर धरण-२ मधून १५ दशलक्ष लिटरपाणी प्रतिदिन नागरिकांना मिळणार आहे. हे धरण लघुपाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे लघुपाटबंधारे खात्यामार्फत ही पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. या कामाचा एकूण खर्च ५२ कोटी रुपये एवढा आहे. पहिल्या टप्प्यात खोलसापाडा धरण-२  हे  विकसित केले जाणार आहे.

या खोलसापाडा- २ धरणाच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले होते. त्यातील मुख्य अडसर हा वनखात्याचा होता. खोलसापाडा धरणाच्या धरणाचे पाणलोट क्षेत्र वनखात्याच्या जागेत आहे. त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि ६ लाख झाडांचे वनीकरण करण्याची अट  होती. यासाठी वनखात्याला १२ कोटी रुपयांचा मोबदला द्यायचा होता. याशिवाय अनेक तांत्रिक अडचणी होत्या. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकरणी पाठपुरावा सुरू केला होता. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि वनखात्याला १२ कोटी रुपये सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी दिली. या खोलसापाडा धरणातून पालिकेला दररोज १५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होणार आहे. हे धरण पालिकेच्या मालकीचे असणार आहे, असे त्यांनी सांगितले. एमएमआरडीएमार्फत देहरजी धरणाचे काम केले जाणार आहे,  तर दुसऱ्या ठिकाणी राजावली, तिल्हेर आणि सातिवली या ठिकाणी साठवण तलाव तयार केले जाणार आहेत, अशी माहिती आ. क्षितिज ठाकूर यांनी दिली.

१०० टक्के पाणी आरक्षित

सध्या वसई-विरार शहराला सूर्या- धामणी धरणातून दशलक्ष लिटर, सोबत सूर्या टप्पा -३  मधून १०० दशलक्ष लिटर, उसगाव धरणातून २० आणि पेल्हार धरणातून १० दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची तूटही मोठी आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी मिळत नाही. त्यामुळे या खोलसापाडा धरणाचा मोठा आधार मिळणार आहे. वसई विरार शहरापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. हे धरण वसई तालुक्यातच असल्याने शहराला सर्वात जवळ असणारे हे धरण आहे. खोलसापाडा धरण १ आणि खोसलापाडा धरण- २ अशी एकूण दोन धरणे आहेत. दोन्ही धरणांमधून शहराला ७० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन मिळणार आहे. त्यापैकी धरण १ मधून ५० दशलक्ष लिटर आणि धरण-२ मधून २० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण मालकी महानगरपालिकेची असणार आहे. धरणातील १०० टक्के पाणी महानगरपालिकेसाठी आरक्षित राहील. पाटबंधारे विभाग फक्त प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. खोलसापाडा धरण १ चा खर्च ११४ कोटी आहे तर खोलसापाडा धरण २ चा खर्च ५२ कोटी रुपये एवढा आहे. खोलसापाडा धरण २ चे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New dam two years ysh

Next Story
रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती