वसई : वसई विरार मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाठी न्यायवैद्यक वाहनांची संख्या वाढविण्यात येत आहे. नुकताच विरार परिमंडळ ३ च्या पोलीस दलात अत्याधुनिक अशा स्वरूपाचे न्यायवैद्यक वाहन (फॉरेन्सिक व्हॅन) दाखल झाले आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे.
मागील काही वर्षांपासून विविध ठिकाणच्या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः गुन्हे करण्यासाठी आता गुन्हेगार हीअत्याधुनिक पध्दतीचा वापर करून गुन्हे करतात. त्यामुळे गुन्ह्याची उकल करतांना तपास यंत्रणेस अडचणी निर्माण होत असतात. गुन्हा उघडकीस आल्यावरही तपासात संशयितांच्या विरुद्ध पुरावे, शास्त्रीय पध्दतीचा वापर करून पुरावे संकलित न केल्यास गुन्हेगार न्यायालयातून सहज सुटका होते.
असे प्रकार रोखण्यासाठी व सबळ पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यक वाहन ही महत्त्वाची भूमिका बजावतात याच पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाला राज्य शासनाने नवीन न्यायवैद्यक वाहन उपलब्ध देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी आयुक्तालयातील परिमंडळ १ आणि २ साठी ही वाहने दिली होती. मात्र विरार परिमंडळात हे वाहन नव्हते आता या विभागात ही तिसरे न्यायवैद्यक वाहन उपलब्ध करून दिले आहे.
या वाहनांमुळे पोलीस तपास पथकास गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून घटनास्थळावर आढळून येणारे सुक्ष्म पुरावे जमा करण्यास या वाहनामुळे मदत होणार आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील रासायनिक तसेच जीवशास्त्र विश्लेषण, तांत्रिक विश्लेषण आदी बाबींचा बारकाईने अभ्यास करत तपासकामात मदत होईल. नवीन गुन्हे फौजदारी कायद्या नुसार, ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञांची भेट आवश्यक आहे. या वाहनामुळे तपास काम अधिक सुलभ होणार असल्याचे विरार परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सांगितले आहे.
पुरावे अचूक पद्धतीने गोळा होणार
न्यायवैद्यक वाहनामुळे एखादा गुन्हा घडला तर त्याचे अचूक पुरावे अगदी कमी वेळेत शोधण्यास याची मदत होणार आहे. हे वाहन आधुनिक उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी सुसज्ज आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी कारवाई, सायबर गुन्हे, फसवणूक, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे, हत्या आणि चोरी आदी प्रकरणांमध्ये या वाहन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. डीएनए, हत्यारे, डिजिटल डेटा रिकव्हरी यासारख्या महत्त्वाच्या चाचण्या करता येतील. फॉरेन्सिकच्या समावेशामुळे, वसई-विरार पोलिस आता गुन्हेगारीच्या तपासात अधिक तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत, जे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
