वसई : पोलिसांना गस्तीवर व घटनास्थळी ये-जा करण्यासाठी असलेल्या वाहनांची संख्या अपुरी असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर पालघर जिल्हा प्रशासनातर्फे पोलिसांकरिता १३ नवीन चारचाकी वाहने व ३५ दुचाकी वाहने दिली आहेत. त्यामुळे सध्या स्थितीत पोलिसांच्या वाहनांचा प्रश्न सुटला आहे.

वसई-विरार शहराच्या नागरीकरणासह लोकसंख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. अशा वेळी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलिसांच्या समोरील मोठे आव्हान आहे. तसेच आता वसई-विरारमधील पोलीस ठाण्यांचा विस्तारही झाला आहे.

वसई-विरार शहरात वालीव, तुळींज, नालासोपारा, विरार, वसई, मणिकपूर, अर्नाळा , पेल्हार, आचोळे अशी नऊ पोलीस ठाणी सध्या कार्यरत आहेत. दररोज विविध ठिकाणच्या भागात विविध प्रकारचे गुन्हे घडत असतात. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना अत्याधुनिक वाहनांची गरज असते. मात्र वसई-विरार शहरातील पोलीस ठाण्यांकडे सरकारी मालकीच्या वाहनांची कमतरता भेडसावत होती.

अशा स्थितीत शहरात गस्त घालणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत होता. अशा वेळी पोलिसांना स्वत:च्या दुचाकी वापरून घटनास्थळी व गस्तीवर पोहचावे लागत होते. विशेषत: रात्रीच्या सुमारास अधिक अडचणी येत होत्या. यामुळे पोलिसांना पुरेशा प्रमाणात वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.

त्यानुसार पालघर जिल्हा प्रशासनातर्फे १३ नवीन चारचाकी वाहने व ३५ दुचाकी वाहने पोलिसांना देण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील १३ चारचाकी वाहनांचे हस्तांतरण  बुधवारी राज्याचे कृषिमंत्री व पालघर जिल्ह्यचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. ही वाहने पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. तर ३५ दुचाकी वाहनेही लवकरच पोलिसांच्या ताफ्यात दाखल होतील असे आश्वासन ही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले आहे. पुरेशा प्रमाणात वाहने उपलब्ध झाल्याने पोलिसांना घटनास्थळी व गस्तीवर ये जा करण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत.