वसई– अडीचशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वसई विरार महापालिकेच्या नवीन मुख्यालय इमारतीचे उद्घटन बुधवारी करण्यात आले. आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते मुख्यालयाच्या इमारतीची फित कापण्यात आली. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, खासदार डॉ हेमंत सावरा उपस्थित होते. मागील ४ वर्षांपासून या मुख्यालयाची इमारत बांधून तयार होती. उद्घटन झाल्यानंतर लगेचच या जुन्या मुख्यालयाती कार्यालये नवीन इमारतीत स्थलांतरीत केली जाणार आहेत.
हेही वाचा >>> वसई: सनसिटी येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
वसई विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. परंतु पालिकेला स्वत:चे मुख्यालय नव्हते. विरार पुर्वेला असलेल्या विरार नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीत पालिकेच्या मुख्यालयाचे काम सुरू होते. अपुर्या जागेमुळे अधिकारी, कर्मचार्यांना बसायला जागा नव्हती तसेच सर्वसामान्य नागरिकांचे देखील हाल होत असायचे. त्यामुळे विरार पश्चिमेच्या यशवंत नगर येथील परिवहन भवनानचे रुपांतर मुख्यालयासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०२० पासून त्याचे काम सुरू होते. मात्र मुख्यालयाची इमारत तयार होईनही तेथे कार्यालय स्थलांतरी करण्यात आले नव्हते. अखेर बुधवारी नवीन मुख्यालयाचे उद्घघाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. संध्याकाळी ५ वाजता आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते मुख्यालयाचे फित कापून उद्घघाटन करण्यात आले. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, खासदार डॉ हेमंत सावरा, पालिका आयुक्त अनिलकुमार पवार आदी उपस्थित होते. प्रशासकीय कामकाज सोयीचे व्हावे, नागरिकांची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. अधिकार्यांची प्रशस्त दालने, सभागृह, अभ्यागत कक्ष, भोजनालय, आदी तयार करण्यात आले आहे. हे मुख्यालय अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे, असे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले. पुढच्या महापालिका निवडणुकीनंतर आमचे नगरसेवक सत्तेत या महापालिकेत विराजमान होतील, असा विश्वास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> Video: भाईंदर रेल्वे स्थानकात पिता-पुत्राची ट्रेनखाली आत्महत्या
…असे आहे नवीन मुख्यालय
विरार पश्चिमेच्या यशवंत नगर मध्ये हे नवीन मुख्यालय आहे. पालिकेचे नवीन मुख्यालय ७ मजली असणार आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ३ लाख चौरस फूट एवढे प्रशस्त आहे. मुख्यालयाच्या इमरातीसाठी २०० कोटीं रुपये तर बांधकामांसाठी ४५ कोटी रुपये खर्च आल्याची या इमारतीत आयुक्तांसह सर्व प्रमुख अधिकार्यांचे सुसज्ज दालन, सभागृह, स्थायी समिती सभागृह, कॅण्टीन, अभ्यागत कक्ष, आहे. या मुख्यालयातील पहिल्या दोन मजल्यावर परिवहन भवन तयार करण्यात येणार आहे तर ३ ते ७ मजल्यामध्ये मुख्यालय आहे. या मुख्यालयाच्या समोर मोकळी जागा असल्याने सुसज्ज वाहनतळ आहे.
आंबेडकरी संघटनांची निदर्शने नवीन मुख्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून विविध आंबेडकरी संघटनांनी केली होती. मात्र मुख्यालयात आंबेडकरांचा पुतळा नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. बुधवारी उद्गघाटनाच्या वेळी कार्यकर्त्यांनी खासदार, आमदार आणि आयुक्तांना घेराव घातला. त्यावेळी लवकर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल, तसेच आंबेडकारांचे तैलचित्र तात्काळ लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. पुतळा उभारण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन खासदार सावरा यांनी दिले. डॉ. दिनेश कांबळे, ॲड गिरीश दिवाणजी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
© The Indian Express (P) Ltd