वसई:- नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांची संख्या वाढत आहे. मात्र काही नायजेरियन बेकायदेशीरपणे वास्तव्य तसेच विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस व महापालिका प्रशासनाने नालासोपाऱ्यात नायजेरियन नागरिकांची धरपकड सुरू केली आहे. बुधवारी सकाळपासूनच ही कारवाई सुरू असून आतापर्यंत शेकडो नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वसई विरार परिसरात मोठय़ाप्रमाणात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. गेल्या काही वर्षांपासून नायजेरियन नागरिकांची संख्येत वाढ होऊ लागली आहे. अनेक गुन्ह्यात नायजेरियन नागरिकांचा समावेश आढळून येत आहे. अमली पदार्थाचे व्यवहार व इतर गैरप्रकारात त्यांचा सहभाग आहे. या प्रकारानंतर पुन्हा एकदा शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा प्रश्न उभा राहिला आहे.

नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर, अगरवाल यासह इतर ठिकाणच्या भागात अधिक प्रमाणात नायजेरियन नागरिकांची वस्ती आहे. त्यांच्यामार्फत रात्रीच्या सुमारास हे अवैध प्रकार केले जाऊ लागले आहेत. त्यांच्या दादागिरीमुळे आजूबाजूला राहणाऱ्या व त्याठिकाणहून जाणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस नायजेरियन नागरिकांची संख्या वाढत आहे.

काही नायजेरियन नागरिक हे विनापारपत्र, विनाव्हीसा बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत आहेत. तर काहींनी इमारतीमध्ये कब्जा मिळवित विनापरवानगी व्यवसाय सुरू केले आहे अशी माहिती समोर आली आहे.

याच पार्श्वभूमीवर बुधवारी  सकाळपासून पोलीस व महापालिका यांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे.

नालासोपारा गुमास्ता  परवान्याशिवाय नायजेरियन लोक ४० दुकाने चालवत होते. तसेच इकडच्या इमारतींमध्ये काही जागांवर त्यांनी कब्जा मिळवला होता. नागरिकांना याचा त्रास होत असून अशा बऱ्याच तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आज पोलीस प्रशासन आणि वसई विरार महापालिका मिळून संयुक्त कारवाई करत आहोत. या कारवाई अंतर्गत या लोकांच्या घराची झडती घेणे, पारपत्र व्हिसा तपासणे, अशी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १०९ विविध देशातील नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. आणि त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती परिमंडळ २ – पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी यांनी सांगितले आहे.