पाऊस लांबला तरी पाणी कपातीपासून वसईकरांना दिलासा ; टंचाईच्या झळा मात्र कायम

पालिकेने पाणीकपात केली नसली तरी अजूनही शहरात अनेक भागात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत.

water tap
प्रतिनिधिक छायाचित्र

विरार :  सध्या पाऊस लांबणीवर पडला असला तरी वसई-विरार महानगरपालिकेने तूर्तास पाणीकपातीचा निर्णय  प्रलंबित ठेवत नागरिकांना दिलासा दिला आहे. केवळ एकाच धरणात वर्षभर पुरेल इतका साठा असून  इतर दोन धरणांत केवळ महिनाभराची सोय असतनाही पालिकेने अजूनही पाणीकपातीचा निर्णय घेतला नाही. पालिकेने पाणीकपात केली नसली तरी अजूनही शहरात अनेक भागात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत.

 जून महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असून नियमित पावसाला सुरुवात झाली नाही. जून महिन्यात केवळ २७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस सुरू झाला नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे जलाशय सुकत चालले आहेत. यामुळे शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेने पाणी कपात केली नसली तरी अजूनही शहरातील अनेक भागांत तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना जून महिन्यातही पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. त्यात पाणीकपात करण्यात आली तर नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.

राज्यातील अनेक मोठय़ा शहरात पाणी कपात लागू केली असताना वसई-विरार महानगरपालिकेने मात्र अजूनही असा कोणता निर्णय घेतला नाही. पालिका पाणीपुरवठा विभागाकडून दिलेल्या माहिती नुसार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी धरणात २२.६० टक्के साठा आहे. हा साठा वर्षभर पुरेल इतका असल्याचे पालिकेने सांगितले. तर उसगाव धरणात १९.८४ टक्के हा साठा ३० दिवस तर पेल्हार धरणात ६.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे केवळ एकाच धरणावर पालिकेची भिस्त आहे. यामुळे महिनाभरात पावसाने दमदार आगमन नाही केले तर वसई विरार महानगर पालिकेला सुद्धा इतर शहरांप्रमाणे पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागू शकतो.

अधिकृत पाणी कपात पालिकेने लागू केली नसली तरी नियोजनाचा अभाव असल्याने शहरातील अनेक भागात तीन ते चार दिवसाआड कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाणी कपात नसतानाही पाणी कपातीचा त्रास सहन करावा लागत आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No cut water in vasai virar city despite shortfall of rain zws

Next Story
वसई-विरारच्या सुशोभीकरणाची योजना ; भव्य प्रवेशद्वार, स्मार्ट पार्किंग, सुशोभीत नाक्यांचा समावेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी