वसई: रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीचे अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिल्यामुळे अमराठी रिक्षाचालकांचा मराठी शिकवणी वर्गांकडे असलेला कल वाढला आहे. गेल्या दोन महिन्यात वसई विरारमधील सात हजारहून अधिक चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून अधिकाधिक रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकता यावी, यासाठी शिकवणी वर्गांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास असणाऱ्या पण, मराठीत न बोलणाऱ्या रिक्षा चालकांचा मुद्दा वादग्रस्त ठरल्यानंतर अमराठी रिक्षा चालकांना मराठीचे धडे देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. तसेच यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदतही ठरवण्यात आली. त्यानुसार १ जूनपासून परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या अभ्यास केंद्रांमध्ये रिक्षा चालकांनी प्रवाशांशी मराठी भाषेत कशाप्रकारे संवाद साधावा, याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे. या उपक्रमांतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण विनामूल्य असून रिक्षाचालकांना चार तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
वसई विरार शहरातही परराज्यातून वाढत असलेल्या स्थलांतरामुळे अमराठी रिक्षाचालकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या भागात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रांमार्फत रिक्षा चालकांना मराठीचे धडे दिले जात आहे. तर १५ ऑगस्ट ही अखेरची तारीख असल्यामुळे जुलै महिन्याच्या उत्तरार्धात मराठी भाषा शिकण्याकडे रिक्षाचालकांचा कल वाढला आहे.
अतिरिक्त केंद्र आणि वेळापत्रकात बदल
वसई विरार शहरात सुरुवातीला नऊ प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकवली जात होती. मात्र, रिक्षा चालकांची वाढती संख्या आणि मुदत संपण्यास शिल्लक असलेला कमी वेळ यामुळे गोंसालो गार्सिया महाविद्यालयाप्रमाणे इतर ठिकाणी अतिरिक्त केंद्र उभारून चालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच प्रशिक्षणाच्या दिवसांमध्ये असलेला ७ दिवसांचा कालावधी कमी करून तो दोन ते तीन दिवसांवर आणला असल्याचे या उपक्रमाच्या पालघर जिल्हा समन्वयक सीमा पाटील यांनी सांगितले.
सात हजार रिक्षाचालकांचे प्रशिक्षण पूर्ण
परवाना रद्द होऊ नये, या भीतीने मोठ्या संख्येने रिक्षाचालकांनी मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यात सात हजारहून अधिक रिक्षाचालकांनी मराठी भाषा शिकून तोंडी परीक्षा दिली असल्याची माहिती प्रशिक्षकांनी दिली.
