वसई : महाबळेश्वर येथे तयार होणारी स्ट्रॉबेरी आता वसईच्या वातावरणातही तयार होऊ लागली आहे. त्यामुळे, वसईच्या शेतकऱ्यांनीही स्ट्रॉबेरीची लागवड करत हा प्रयोग यशस्वी केला आहे.
वसई, विरारच्या बहुतांश भागात भातशेती, फुलशेती, भाजीपाला लागवड, कांदा उत्पादन अशा विविध प्रकारची शेती केली जात आहे. आता महाबळेश्वर येथे होणारी स्ट्रॉबेरीची लागवड चक्क वसई, विरारमध्येही करण्यात आली आहे. वसई पूर्वेच्या सेवा विवेक प्रकल्पावर चार गुंठे जागेत तरुण शेतकरी राकेश अधिकारी यांनी स्ट्रॉबेरीच्या पिकाची लागवड केली आहे. लावण्यात आलेली स्ट्रॉबेरी स्वीट सेन्सशनची असून स्ट्रॉबेरी शेती ही मल्चिंग पद्धतीने केली आहे. सुमारे एक हजार रोपांची लागवड करण्यात आली असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता लालबुंद स्ट्रॉबेरीचे पीक त्यांच्या हाती लागले आहे . वसई पूर्वेच्या ससूनवघर येथील तरुण शेतकरी सुशांत पाटील यांनी मातीविना स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली आहे. त्यांनी नारळाच्या भुसा त्यावर ही रोपे लावली आहेत व स्ट्रॉबेरी तयार होण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्मिती केली असल्याचे सुशांत यांनी सांगितले. महाबळेश्वर येथे होणारी स्ट्रॉबेरी आता वसईच्या वातावरणातही तयार होत आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर येत्या काळात वसईच्या भागातही सहज स्ट्रॉबेरी उपलब्ध होऊ शकणार आहे.
‘महाबळेश्वरला आल्याचा आनंद’
स्ट्रॉबेरीच्या शेतीमुळे निसर्गरम्य विवेक सेवा प्रकल्प अजून फुलून उठला आहे. प्रकल्पावर भेट देणाऱ्या विविध पर्यटकांना पाहुण्यांना स्ट्रॉबेरीचे शेती पाहून आश्चर्य व कुतूहल वाटत आहे. आधीच पडलेला गारवा आणि समोर लालेलाल आणि हिरवे असे स्ट्रॉबेरीचा शेत त्यामुळेच काही जण महाबळेश्वरला आलो आहे, असे वाटत असल्याची प्रतिक्रिया देत आहेत.
सध्या प्रदूषणामुळे मातीमध्ये पिकांची उगवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे मातीविना नारळ भुसा वापरून शेती करण्याचा प्रयोग केला आहे. स्ट्रॉबेरीची जवळपास २०० ते २५० रोपे लावली आहेत.