बेकायदा ‘नो पार्किंग’चे फलक 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : वसई-विरार शहरात अरुंद रस्ते आणि वाहनतळांची कमतरता असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे दुकानदारांनी बेकायदेशीरपणे ‘नो पार्किंग’चे फलक लावून सार्वजनिक जागा अडविल्याचा प्रकार समोर आला आहे. वसई-विरार शहरातील वाढती वाहन संख्या, अपुरे रस्ते आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली आहे. नागरपालिकेने वाहनतळ उभारलेले नसल्याने वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना जागा मिळत नाही आणि या समस्येत भर पडत आहे. त्यात आता दुकानदारांनी बेकायदेशीरपणे नो पार्किंगचे फलक लावून जागा अडविण्यास सुरुवात केली आहे. विरार पश्चिमेच्या जुन्या विवा महाविद्यालयासमोर असलेल्या वोडाफोन या मोबाइल सेवा केंद्रचालकाने चक्क पालिकेच्या रस्त्यावर असलेल्या झाडांवर नो पार्किंगचे फलक लावून जागा स्वत:साठी आरक्षित केली आहे. कुणी त्या जागेवर वाहने उभी केल्यास वाहनांची हवा काढण्यात येते. वोडाफोनचे दुकान खासगी जागेवर आहे. समोर प्रशस्त रस्ता आहे. मात्र तरीदेखील दुकानदारांनी नो पार्किंगचे फलक लावून जागा अडवली आहे, अशी तक्रार विरार येथील रहिवासी आशीष कदम यांनी केली आहे. नो पार्किंगचे फलक लावण्याचा अधिकार पालिका आणि वाहतूक पोलिसांना आहे. अशा प्रकारे दुकानदार बेकायदा जागा कशी अडवू शकतात, असा सवाल त्यांनी केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obstruction public spaces shopkeepers ysh
First published on: 21-01-2022 at 00:02 IST