वसई: नागरिकांची होणारी गैरसोय आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे वालीव येथील जी प्रभाग समितीचे कार्यालय तसेच गोखिवरे विभागीय कार्यालय आणि सातीवली विभागीय कार्यालयाची इमारत धोकादायक ठरल्यामुळे ही तिन्ही कार्यालये गोखिवरे येथील बहुउद्देशिय इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहेत.

वसई पूर्वेला वालीव नाका येथे जी प्रभाग समितीचे कार्यालय आहे. नगरपालिकेशी संबंधित समस्यांचे निराकरण, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, रस्ते आणि गटारे दुरुस्ती, परवाने नूतनीकरण अशा विविध कामांसाठी नागरिक या कार्यालयाग ये-जा करत असतात. पण, वालीव कार्यालय उद्वाहक तसेच इतर सोयीसुविधा नसल्यामुळे ते  नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत होते. त्यामुळे महापालिकेने जी प्रभाग समितीचे कार्यालय वसई पूर्वेतील फादरवाडी येथील बहुउद्देशिय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित केले आहे.

तसेच प्रभाग समिती जी अंतर्गत येणारी गोखिवरे आणि सातीवली विभागीय कार्यालयांच्या इमारती धोकादायक झाल्यामुळे ही कार्यालये बहुउद्देशिय इमारतीच्या तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत.