विरार : वसईमध्ये दोन उच्च शिक्षित तृतीयपंथीयांना घर भाडय़ाने देण्यास विरोध करण्यात आला. यासंदर्भात त्यांनी वालीव पोलिसांची मदत मागितली असता पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप या तृतीयपंथीनी केला.

नायगाव पूर्व पारसनाथ परिसरात राहणाऱ्या दोन तृतीयपंथी मोना हिंगमिरे आणि उज्ज्वला पाणी यांना घरमालकाने अनामत रक्कम घेऊनही घर भाडय़ाने देण्यास नाकारले आहे. मोना हिंगमिरे या वाणिज्य शाखेतील पदवीधर असून त्याची मैत्रीण हिने परिचारिकेची पदवी घेतली आहे. याआधी गुजरातमध्ये काम करत होत्या, पण टाळेबंदी आणि करोनामुळे वसईत दाखल झाल्या. त्यांना राहण्यासाठी घराची आवश्यकता होती. यावेळी त्यांना इस्टेट एजंट सुनील सिंग यांच्याशी ओळख झाली. सिंग याने त्यांना नायगाव पूर्व पारसनाथ येथे एक सदनिका दाखवली. त्यांनी ही सदनिका पसंत केली, पण सोसायटीत विरोध नको म्हणून त्यांनी इस्टेट एजंटच्या नावाने भाडे करार करण्याचे सांगून त्यांच्याकडून एक लाख रुपये अनामत रक्कम घेतली. पण जेव्हा त्या पूजा करण्यासाठी गेल्या असता गृहसंकुलातील इतर सदस्यांनी त्यांना विरोध करत सदनिका मालकावर दबाव आणला. घरमालकाने दबावापोटी त्या तृतीयपंथीयांना घर खाली करण्यास सांगितले. सुनील सिंग यांनी त्यांना दुसरे घर दाखविले, त्यातसुद्धा सदनिकाधारकाने भाडेकरार करूनही नंतर केवळ विरोधामुळे त्यांना घर नाकारले. वालीव पोलीस ठाण्यात केवळ तृतीयपंथी असल्याने घरे नाकारली जात असल्याची तक्रार दिली असता पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असल्याचे मोना हिने सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रवादी पक्षाच्या तृतीयपंथी सेल विभागाच्या अध्यक्षा प्रिया पाटील यांनी सांगितले की, त्यांनासुद्धा घर मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. एकीकडे सरकार लिंगभेदता मानू नये यासाठी कायदा करत असतानाही तृतीयपंथीना घरे नाकारली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.