वसई:- वसई विरार महापालिका निवडणुकीत ४२ हजार २०७ मतं ही ‘नोटा’ ला मिळाली आहेत. चार सदस्य प्रभाग पद्धतीत एका मतदाराला चार मत देण्याचा अधिकार होता. साडे दहा हजार मतदारांनी नोटाचा पर्याय निवडून उमेदवारांना नाकारले असल्याचे चित्र दिसून आले आहे.
वसई विरार महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक १५ जानेवारीला पार पडली. या निवडणुकीसाठी ११ लाख २६ हजार ४०० मतदार होते त्यापैकी ६ लाख १ हजार १४१ पुरुष (५३%) तर ५ लाख २५ हजार ११३ (४७%) महिला मतदार आहेत. याशिवाय १४६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता.
महापालिकेच्या ९ प्रभाग समित्यांमध्ये निवडणूक कार्यालये उभारण्यात आली होती. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष असे एकूण ५४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. बविआ ११३, भाजप ९५, शिवसेना (शिंदे गट)२७, शिवसेना ( ठाकरे गट) ८९, राष्ट्रवादी (अजित पवार ) १३, एमआयएम ७, बसपा १४, काँग्रेस १०, वंचित१२ ,अपक्ष १६७ यांचा समावेश होता.
या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे ७०, भाजपचे ४३ व शिवसेना (शिंदे गट) १, आणि काँग्रेसचा १ असे नगरसेवक निवडून आले आहेत. वसई विरार महापालिकेत मध्ये ११ लाख २६ हजार ४०० मतदारांपैकी ६ लाख ४३ हजार ४२७ मतदारांनी मतदान केले. यात ३ लाख ४७ हजार ४७९ पुरुष व २ लाख ९५ हजार ९२४ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तसेच इतर २४ मतदारांचा समावेश आहे. असे एकूण ५७.१२ टक्के इतके मतदान झाले होते. या ६ लाख ४३ हजार मतदारांपैकी वसई विरार मध्ये सुमारे साडे दहा हजार मतदारांनी ४२ हजार २०७ मत ही ‘नोटा’ ला देत उमेदवारांना नाकारले असल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
