वसई: वसईत भोंदू बाबाकडून महिलांची फसवणूक करून लैंगिग अत्याचार केल्याची घटना समोर येताच जिल्ह्यातील वाढती भोंदूगिरी, जादूटोना आणि अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पालघर जिल्हा शाखेच्या सदस्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच यासंबंधी निवेदनही त्यांनी सादर केले आहे.
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण ताजे असताना वसईतही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना उघडकीस आली आहे. दैवीशक्तीचा संचार असल्याची बतावणी करुन वसईतील ऋषीकेश वैद्य याने पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्यचाार केल्याची फिर्याद वसईतील माणिकपूर पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हातील वाढती भोंदूगिरी, जादूटोना आणि अंधश्रद्धेला आला घालता यावा यासाठी अंनिसच्या पालघर जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाने सोमवारी, ३० मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र नाईक यांची भेट घेऊन जिल्ह्यातील ‘खरात बाबा’ सारख्या भोंदू बाबांवर आणि त्यांच्या समर्थकांवर जादूटोना विरोधी कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कक्ष’ स्थापन करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच पोलिसांना संतांचे अंधश्रद्धा विरोधी विचार असलेल्या पुस्तिकांचा संच आणि ‘अंनिस वार्तापत्र’ भेट देण्यात आले.
तसेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) च्या माध्यमातून प्रबोधन करण्याची परवानगी मिळावी, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अशोक भागडे यांना निवेदन देण्यात आले.उमेदच्या माध्यमातून परवानगी मिळाल्यास जिल्ह्यातील सुमारे दीड लाख महिलांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.
यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या मनातील गैरसमज दूर होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यास मोठी मदत होईल,” असे मत अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय भोईर यांनी व्यक्त केले. यावेळी अंनिसचे अध्यक्ष ॲड. दीपक भाते, राज्य कार्यकारी समिती सदस्य अण्णा कडलासकर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय भोईर, कार्यवाह जतीन कदम, संदेश घोलप, जगदीश राऊत, ॲड. गणेश भापकर, धनंजय वायदंडे, स्वाती भोईर, आसिफा शेख आणि इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
