वसई: मागील काही दिवसांपासून वसई विरार शहरात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तसेच मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात असून या अलर्टनुसार शहरात उष्णतेची लाटसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून वसई विरार शहरात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

तर प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांत शहरातील तापमानात अधिक वाढ होणार असल्याचे कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ११ ते १५ मार्च दरम्यान पालघर जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होऊन ते ३४ ते ४१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानातही १५ ते २० अंश सेल्सिअस वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनाही आव्हान

कमाल तापमानात वाढ होणार असल्याने फळबाग, उन्हाळी पिके, आणि रोपवाटीकेच्या जमिनीच्या बाष्पीभवनात वाढ होणार असल्याने पाण्याचा ताण जाणवण्याची शक्यता कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच पुढील पाच दिवस उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता असल्याने कीड-रोगांचा प्रसार जलद होण्याची शक्यता असते, त्यामुळे फळ बागांची पाहणी करून वेळेवर उपाययोजना करण्याचे आणि फळबाग, उन्हाळी पिके व रोपवाटीकेतील जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाच वापर करण्याचा आव्हानही त्यांनी केले आहे.