वसई: पालघर लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत: उमेदवार असल्याप्रमाणे कामाला लागण्याचे आदेश पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी निवडणूक लढून जिंकून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या १-२ दिवसांत उमेदवारीची घोषणा केली जाणार आहे.

बहुजन विकास आघाडी पक्षाची, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य अशी सभा विरार येथे पार पडली. या भव्य सभेला पक्षाचे अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह पक्षाचे दोन्ही आमदार, माजी खासदार, सर्व माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच जिल्हा व तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आदी पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्याकडे अनेक चांगले उमेदवार असून येत्या देखील एक दोन दिवसांत सर्वानुमते उमेदवार जाहीर केला जाईल. मात्र प्रत्येक कार्यकर्ता हाच उमेदवार आहे असे समजून कामाला लागा असा संदेश कार्यकर्त्यांना पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिला. युती आघाडीवर टीका करण्यात मला रस नाही. आपण केलेली कामे ही प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचवा. जेव्हा जेव्हा आपण कोणाची मदत न घेता एकट्याने लढतो तेव्हा जिंकतो. आताही आघाडी व युतीने उमेदवार दिलेला आहे. आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे असेही ते म्हणाले.वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात आपला जनाधार वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : वसईत ‘बंटी बबलीची’ अनोखी चोरी, प्रख्यात ज्वेलर्स दुकानाला हातोहात गंडवले

आमदार राजेश पाटील यांनी जिल्ह्यात आपले तीन आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती, सदस्य व सर्वात जास्त ग्रामपंचायत तसेच वसई विरार सारखी मोठी महानगरपालिका यांवर आपल्या पक्षाचे एकहाती वर्चस्व असताना व जवळपास ५०% मतदार हे आपले असल्यामुळे यावेळचा खासदार हा आपल्याच पक्षाचा असणार असा विश्वास व्यक्त केला. विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे सतत ग्रामपंचायत पातळीवरचे कामाचे श्रेय चोरुन लाटताना आपल्या स्वतःच्या कतृत्वावर सपशेल अपयशी ठरल्याची टीका आमदार राजेश पाटील यांनी केली.

हेही वाचा : महावीर जयंती निमित्त चिकन, मटण दुकाने बंद ठेवण्याचे आदेश; पालिकेच्या निर्णयाविरोधात वसईकरांचा संताप

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर व कार्याध्यक्ष राजीव पाटील यांनी “लोकसभेची निवडणूक लढवायची का?” असे विचारताच कार्यकर्त्यांनी ‘हो’ म्हणत घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा हितेंद्र ठाकूर यांनी, “नुसतं लोकसभा लढवायची नाही तर जिंकण्यासाठी लढायची” असे सांगितले. या सभेला माजी खासदार बळीराम जाधव, माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष बुकले, माजी महापौर नारायण मानकर यांनी देखील संबोधित केले. आमदार हितेंद्र ठाकूर देतील तो उमेदवार आम्ही एकदिलाने निवडून आणू असा निर्धार सर्व नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.