वसई :- आगामी विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच, पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. बहुजन विकास आघाडीचे (बविआ) ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर राजीव पाटील यांच्या कार्यालयाला भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकप्रतिनिधींनी दिलेल्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
गुरुवारी पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा आणि भाजप आमदार राजन नाईक यांनी शहरात विशेष पाहणी दौरा केला. मात्र या दौऱ्या दरम्यान त्यांनी विरार येथील राजीव पाटील यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. महायुती आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात आगामी विधानपरिषदेच्या जागेवरून काही पडद्यामागे हालचाली सुरू आहेत का, अशी शंका या भेटीमुळे उपस्थित केली जात आहे.
ही भेट पूर्णपणे बिगर राजकीय आणि केवळ विकासकामांवर चर्चा करण्यासाठी असल्याचे दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. विरार परिसरातील पावसाळापूर्व नालेसफाई, नारंगी येथील उड्डाणपुलाचे काम आणि विरार रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या प्रवासी अडचणी सोडवण्यासाठी भाजप लोकप्रतिनिधींचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यानंतर नेत्यांनी राजीव पाटील यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राजीव पाटील काय म्हणाले ?
खासदार आणि आमदार विरार परिसराच्या दौऱ्यावर आले होते. नालेसफाई आणि नारंगी पुलाच्या कामांची पाहणी करून रेल्वे स्टेशनच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी हा दौरा होता. माझे कार्यालय रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. शिवाय, माझे सर्वपक्षीय नेत्यांशी नेहमीच सलोख्याचे आणि कौटुंबिक संबंध राहिले आहेत. त्यामुळे ही केवळ एक सदिच्छा भेट होती असे माजी महापौर राजीव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय या भेटीत कोणत्याही प्रकारची विधानपरिषद निवडणूक व अन्य राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या हाती – आमदार राजन नाईक
या भेटीबाबत अधिक स्पष्टता देताना भाजप आमदार राजन नाईक यांनी राजकीय चर्चा फेटाळून लावल्या. “आम्ही खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्यासोबत नागरी प्रश्नांची पाहणी करण्यासाठी आलो होतो. वसई-विरारच्या विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही प्रथम महापौर राजीव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे असे नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
