वसई: ऑक्टोबर महिन्यापासून प्रवासादरम्यान सवलतधारकांना एनसीएमसी कार्ड बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील प्रवाशांचा नोंदणीकडे असणारा कल वाढला आहे. गेल्या महिनाभरात एनसीएमसी कार्ड नोंदणीत २० हजाराने वाढ झाली असून यात महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिक यांना एसटी महामंडळाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यायचा असल्यास १ ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. सवलतधारकांना नोंदणी करता यावी म्हणून यापूर्वी प्रशासनाकडून दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. वसई विरार शहरासह पालघर जिल्ह्यातील बरेचसे नागरिक अजूनही एसटीने प्रवास करतात. यात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. तर एसटीकडून पुरवल्या जाणाऱ्या सवलतींमुळे ही संख्या गेल्या काही काळात अधिकच वाढली आहे.
पालघर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून एनसीएमसी कार्ड नोंदणी सुरू झाली आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रवाशांचा कार्ड नोंदणीकडे कल वाढलेला दिसला. तर दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर आता कार्ड बाळगणे अनिवार्य करण्यात आले असल्यामुळे प्रवासी कार्ड नोंदणीला प्राधान्य देत आहेत. ऑगस्ट महिन्यापर्यंत पालघर जिल्ह्यात एकूण ४५ हजार ४०६ प्रवाशांनी एनसीएमसी कार्डासाठी नोंदणी केली होती. तर महिन्याभरात या यात २० हजारांनी वाढ झाली असून ही संख्या ६५ हजार ५४४ वर पोहोचली आहे. तर यापैकी ४० हजार ६८५ कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत.
इतर प्रवाशांच्या तुलनेत महिला प्रवाशांचा ओघ कार्ड नोंदणीकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात महिला सन्मान योजनेअंतर्गत झालेली ३५ हजार १७६ ही नोंदणी आता ५२ हजार ९८७ वर जाऊन पोहोचली आहेत. महिला सन्मान योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या एकूण कार्डांपैकी आतापर्यंत ३१ हजार ८७९ कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीत मात्र फारशी वाढ झालेली दिसून आलेली नाही. आतापर्यंत ६५ ते ७५ वयोगटातील ७ हजार ३४९ ज्येष्ठ नागरिकांनी तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ४ हजार ४४६ इतक्याच प्रवाशांनी नोंद केली आहे. या दोन्ही गटातील अनुक्रमे ५ हजार २४६ व ३ हजार ५५ इतकी कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत.
आगारनिहाय पाहिल्यास पालघर, वसई व बोईसर या आगारांमध्ये एमसीएमसी कार्डासाठी नोंदणी करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. तर अर्नाळा, सफाळे व डहाणू आगारात प्रवाशांचा प्रतिसाद अतिशय कमी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सवलतधारकांव्यतिरिक्त नोंदणी करणाऱ्या इतर प्रवाशांची संख्या ७६२ असून यापैकी ५०५ कार्ड सक्रिय करण्यात आली आहे.
नोंदणी सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे फरफट
वसई, नालासोपारा व सफाळे या आगारांमध्ये गेल्या काही काळापासून नोंदणी सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर आगारांमध्ये जाऊन नोंदणी करावी लागत आहे. तर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे त्या आजारांची माहिती देणाऱ्या भितीपत्रिका आगारात चिकटवण्यात आल्या असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या पालघर विभागाकडून देण्यात आली. तसेच ज्या घरातील सेवा बंद आहे तेथे नव्या एजंटची नियुक्ती करावी अशी मागणीही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली
