वसई: एसटी महामंडळाकडून सवलत धारकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आल्यानंतर पालघर जिल्ह्यात तब्बल ४५ हजार कार्डांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, या कार्डांच्या सक्रियकरणात (ऍक्टिव्हेशन) काहीसे अडथळे येत असल्यामुळे पालघर जिल्ह्यात नोंदणीच्या तुलनेत फक्त निम्मीच कार्ड प्रत्यक्ष वापरात असल्याचे दिसून येत आहे.

प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, आधुनिक बनवण्यासाठी परिवहन विभागाकडून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) वापरात आणण्याची घोषणा करण्यात आली होती. तर कार्ड नोंदणी व वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून पुढील टप्प्यात इतर सवलत धारकांसाठीही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

महिला व ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यायचा असल्यास एनसीएमसी कार्ड बाळगणे १ सप्टेंबरपासून अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात कार्ड नोंदणीचा ओघ वाढलेला दिसून येत आहे. आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ४०६ एनसीएमसी कार्डांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी महिला सन्मान योजनेंतर्गत ३५ हजार १७६, ६५ ते ७५ वयोगटातील ५ हजार ९७२, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ३ हजार ६२९ व इतर ६२९ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. तर आगरनिहाय नोंदणी पाहिल्यास वसई, बोईसर व पालघर बस आगारात सर्वाधिक कार्ड नोंदणी करण्यात आली आहे.

पण, नोंदणीच्या तुलनेत सद्यस्थितीत केवळ निम्मी म्हणजे २६ हजार ३०४ कार्डच वापरात असल्याचे दिसून येत आहे. यातील महिला सन्मान योजनेंतर्गत १९ हजार ९१, ज्येष्ठ नागरिक प्रवासी ४ हजार २५०, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत २ हजार २५१ व इतर प्रवाशांची ४१२ कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत. कार्ड नोंदणी व सक्रियकरणासाठी नियुक्त कंपनीच्या एजंटकडून कार्ड सक्रिय करण्यास १५ ते ३० दिवसांचा कालावधी लागत असल्याने तसेच प्रवाशांनी नोंदणी प्रक्रियेस उशिराने सुरुवात केल्याने वितरण प्रक्रिया काहीशी संथ गतीने सुरू असल्याची माहिती पालघर एसटी महामंडळ विभागाकडून देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व दिव्यांना दिलासा:

एसटी महामंडळाकडून सुरुवातीच्या टप्प्यात ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यामुळे १ सप्टेंबरपासून त्यांच्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, ७५ वर्ष वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी उशिराने नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांना कार्ड वापरणे बंधनकारक करण्यात आलेले नाही.