बोईसर : तारापूरमध्ये होळीच्या दिवशी चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली. पत्नी घराशेजारील पुरुषासोबत मौजमज्जा करताना दिसल्यानंतर पतीने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. तारापूर पोलीस ठाणे हद्दीत सर्व नागरिक होळीचा सण आनंदाने साजरा करीत असताना पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून निर्घुण हत्या केल्याने खळबळ निर्माण होऊन होळीच्या सणाला गालबोट लागले आहे.

तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील परनाळी आंबात पाडा या गावांमध्ये होळी सणाच्या मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी नितेश सुरेश आबांत याने आपल्या घराच्या अंगणात पत्नी आशा नितेश आंबात (२४) हिला गावातीलच दिनेश उर्फ टिल्लू दांडेकर या परपुरुषासोबत अर्धनग्न अवस्थेत बघितल्याने त्याचा राग अनावर झाला. नितेश आंबात याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन संतापाच्या भरात जवळच पडलेल्या प्लास्टिकच्या दोरीने पत्नीचा गळा आवळून निर्घृणपणे हत्या केली.

गावातील नागरिकांनी हत्येच्या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तारापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निवास कणसे आणि इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पथकाने हत्या झालेल्या ठिकाणाचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी तारापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

तर पत्नीची हत्या करून लपून बसलेल्या आरोपी पतीला मंगळवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपी नितेश आंबात याच्या विरोधात तारापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करून पालघर येथील न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.