वसई : गॅस सिलेंडर नोंदणी प्रक्रियेतील बदलामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनाकडून अंत्योदय आणि प्राधान्य गट योजनेतील लाभार्थ्यांना केरोसीन पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही वसई तालुक्याला मंजूर केरोसिनचा पुरवठा झाला नसल्याने नागरिकांनी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आखाती देशात सुरू असणाऱ्या युद्धामुळे गॅस सिलेंडर पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे एकीकडे गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना, दुसरीकडे विलंबाने होणारा गॅस सिलेंडर पुरवठा, गॅस सिलेंडर नोंदणी प्रक्रियेतील बदल यामुळे नागरिक आणि खासकरून ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी करत प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन वितरीत करण्याचे निर्देश दिले होते.
हा पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार असून विभागाच्या निर्णयानुसार केरोसिन वितरणात अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना केरोसिन देण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले होते. शासनाकडून पालघर जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर आणि वसई तालुक्यासाठी १२ हजार लिटर केरोसिन कोटा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप एकही लाभार्थ्याला केरोसिन पुरवठा करण्यात आलेला नाही.
वसई तालुक्यात सद्यस्थितीत प्राधान्य गट योजनेचे एकूण १ लाख ३७ हजार २०२ लाभार्थी आहेत. तर अंत्योदय योजनेचा लाभ घेणारे ३ हजार ७८६ लाभार्थी आहेत. मात्र, केरोसिन न मिळाल्यामुळे गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत बोलताना १२ हजार लिटर केरोसिन कोटा जरी वसई तालुक्यासाठी मंजूर करण्यात आला असला तरी जिल्हा प्रशासनाकडून अद्याप केरोसिन तालुक्याला केरोसिन पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे केरोसिन लाभार्थ्यांना दिले जात नसल्याची प्रतिक्रिया पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी दिली. तसेच केरोसिन वाटपासाठी ११ दुकाने निश्चित केली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
केरोसिन वाटप ठिकाणे
- १) जूचंद्र
- २) पारोळ
- ३) नालासोपारा (पूर्व)
- ४) नालासोपारा (पश्चिम)
- ५) विरार (पश्चिम)
- ६) नारिंगी (विरार पूर्व)
- ७) वसई (प श्चिम)
- ८) अर्नाळा
- ९) वसई (पूर्व)
- १०) सालोली
- ११) नागले
