वसई : जिल्ह्याच्या नागरीकरण आणि औद्योगिक विस्ताराचा थेट परिणाम हा आता रस्त्यांवरील वाहतुकीवर दिसू लागला आहे. वर्षभरात पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरात १ लाख ४ हजार ९२५ इतकी नवीन वाहने दाखल झाली आहे. विशेषतः मागील वर्षीच्या तुलनेत ११ हजार वाहनांची वाढ झाली आहे.
मागील काही वर्षात शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यापाठोपाठ वाहन खरेदी करण्याचे प्रमाण ही वाढू लागले आहे. यापूर्वी नागरिक केवळ सणाच्या निमित्ताने वाहन खरेदी केली जात होती. आता मात्र वाहन हे प्रत्येक माणसाची गरज बनली असल्याने एरवी सुद्धा वाहन खरेदी कडे कल वाढू लागला आहे. याशिवाय सद्यस्थितीत शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा ही अपुरीच आहे. अनेकदा नागरिकांना ऑटोरिक्षा किंवा बस मिळविण्यासाठी रांगेत उभं राहावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी ही खासगी वाहन खरेदीवर नोकरदार वर्ग भर देताना दिसून येत आहे.
२०२४- २५ मध्ये ९३ हजार ९१७ वाहने दाखल झाली होती. दिवसेंदिवस वाहन वाहनांची संख्या ही वाढतच आहे. यावर्षीच्या २०२५-२६ या वर्षात १ लाख ४ हजार ९२५ वाहनांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आले. जिल्ह्यात वर्षभरात एक लाख वाहने दाखल होण्याची पहिलीच वेळ आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार महिन्याला सरासरी ८ हजार ७४३ वाहने ही रस्त्यावर येत आहे. यात सर्वाधिक दुचाकी, ऑटोरिक्षा, मोटार कार व मालवाहतूक टेम्पो यांचा समावेश आहे.
वाहनखरेदी वाढल्याने परिवहन विभागात मोठ्या संख्येने वाहनधारक नोंदणीसाठी येत असतात. आता सर्व सुविधा या ऑनलाइन स्वरूपातच उपलब्ध झाल्या असल्याने वाहनधारकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत असे परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
पायाभूत सुविधांवर ताण
वाहनांच्या या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील रस्त्यांवर आता वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होऊ लागली आहे. अरुंद रस्ते आणि अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे वसई, विरार, नालासोपारा, पालघर या शहरांमध्ये वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत. याशिवाय या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न ही निर्माण होऊ लागला आहे.
रस्ते आणि वाहतूक शिस्तीची गरज
विशेषतः एका वर्षात ११ हजार वाहनांची वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने हे आर्थिक प्रगतीचे लक्षण वाटत असले तरीही वाढती रहदारीचे नियोजन करणे हे प्रशासना समोरील मोठे आव्हान आहे. या वाढत जाणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ, पर्यायी रस्ते आणि वाहतूक शिस्तीची गरज आहे.असे मत वाहतूक तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
मागील तीन वर्षातील आकडेवारी
- वर्ष / वाहन संख्या
- २०२३-२४ / ८२ हजार १६०
- २०२४- २५ / ९३ हजार ९१७
- २०२५-२६ / १ लाख ४ हजार ९२५
