वसई: वसई विरार शहरातील विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला वेग देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी गुरुवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच सध्या बीएलओंकडून घरभेटी सुरू नागरिकांनी सहकार्य केल्यास ही प्रक्रिया विहित पूर्ण होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात ३० जून ते २९ जुलै दरम्यान मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत २०२६ च्या मतदार यादीतील मतदारांचा २००२ मधील मतदार यादीशी संदर्भ जोडण्याचे काम म्हणजे मॅपिंग करण्यात येत आहे. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात पडलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेले पूरस्थिती यामुळे या प्रक्रियेला खीळ बसली होती.
पालघर जिल्ह्यात एकूण ४८ टक्के मॅपिंग पूर्ण झाले असले तरी या प्रक्रियेत पिछाडीवर असणाऱ्या मतदारसंघांमध्ये वसई, नालासोपारा आणि बोईसरचा समावेश आहे. सद्यस्थितीत वसई विधानसभा मतदारसंघात २३.५४%, नालासोपारा विधानसभा मतदारसंघात २३.६२% आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात २५% टक्के अर्जांचे वाटप करण्यात आले आहे. तर या माहितीपैकी बोईसर विधानसभा मतदारसंघातील ६.१९ %, वसई विधानसभा मतदारसंघातील ३.७६%, नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील २.३५% माहिती संगणकीकृत करण्यात आली आहे.
त्यामुळे या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून सखोल आढावा घेतला जात आहे. लोकप्रतिनिधी, बीएलओ आणि मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्या बैठका घेऊन त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी शासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
निमशहरी भागात अडथळे तर ग्रामीण भागात गती
वसई विरार शहरातील पूरपरिस्थिती, स्थलांतरित नागरिकांची मोठी संख्या, तसेच लोकसंख्येची घनता अशा विविध कारणांमुळे पालघर जिल्ह्याच्या निमशहरी भागात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत काही अडथळे निर्माण झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र ही प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मनुष्यबळाची कमतरता
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच ज्या मतदार केंद्रांमध्ये १२०० पेक्षा जास्त मतदारांचा समावेश आहे, अशा ठिकाणी काम करणाऱ्या बीएलओसह सहाय्यक कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बीएलए म्हणून मदतही घेतली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या घरभेटी देऊन नागरिकांच्या माहितीची पडताळणी केली जात आहे. मात्र, अनेकदा नागरिक घरी नसल्याने या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी घरी राहून बीएलओंना माहिती द्यावी आणि सहकार्य करावे. :- डॉ.इंदूराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर
