वसई: विद्युत रोषणाईने सजलेले पाली चर्च, भाविकांची गर्दी, विक्रेत्यांचा गजबजाट आणि मेणबत्यांच्या प्रकाशात मोठ्या दरवर्षीप्रमाणे यंदाही पालीचा फेस्ता उत्साहात पार पडला. १८ डिसेंबर रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या या आनंदसोहळ्यात वसई तसेच नायगावसह विविध ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते.

नायगाव पश्चिमेतील कोळी बांधवांनी सुमारे ५०० वर्षांपूर्वी देवीची लाकडी मूर्ती सापडली होती. मनोकामना पूर्ण होत असल्याचा अनुभव आल्याने या मूर्तीबद्दलची लोकांची श्रद्धा वाढली. कालांतराने पाली बंदरात येशूची माता म्हणजेच ‘माय-दे-देऊस माऊलीचे’ चर्च उभारण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी १८ डिसेंबर रोजी पालीचा फेस्ता साजरा केला जातो.

जत्रेच्या नऊ दिवस आधी देवीची प्रार्थना केली जाते, या काळाला नोवेना असं म्हणतात. तर दहाव्या दिवशी पालीच्या फेस्त्याचे आयोजन केले जाते. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आठ दिवस आधी जत्रेच्या आयोजन केले जात असल्यामुळे या सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे फक्त वसई आणि नायगावच नाही. तर मुंबई, उत्तन, डहाणू, पालघर अशा विविध ठिकाणांहून विविध जाती धर्मांचे लोक या सणात सहभागी होतात. हार अर्पण करून आणि मेणबत्त्या प्रज्वलित करून मनोकामना पूर्ण व्हावी अशी प्रार्थना माय-दे-देऊस माऊलीकडे करतात अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी क्लोथिंडा डिसुझा यांनी दिली.

नवस आणि मेणाच्या पुतळ्यांची प्रथा

हातापायाला दुखापत झालेले, इतर शारीरिक व्याधी असणारे भक्त मंदिरात येतात आणि त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून मेणाचे शरीर (पुतळे) किंवा मेणापासून तयार केलेला अवयव आणि हार देवीला अर्पण करतात. तसेच अपत्य होत नसलेली जोडपी देवीच्या मिल्किंग मदर या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी येतात. मेणापासून तयार केलेल्या बाळाचा पुतळा अर्पण करून देवीची प्रार्थना करतात. म्हणून विविध इच्छा मनी बाळगून मोठ्या श्रद्धेने अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात, असे पाली चर्चचे धर्मगुरू मिल्टन गोन्सल्विस यांनी सांगितले.

पालीच्या फेस्ताची अनोखी परंपरा

माय-दे-देऊस माऊलीच्या मूर्तीच्या हातात बाळ नसणे हे विशेष मानले जाते. कारण ती येशूच्या जन्माच्या आठ दिवस आधी (प्रतिक्षेत) उभी आहे, अशी परंपरा आहे. म्हणूनच २५ डिसेंबरच्या आठ दिवस आधी—म्हणजे १८ डिसेंबरला तिचा सण साजरा करण्याची प्रथा आजही सुरू आहे.