वसई: वसई तालुक्यातील पाणजू ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. निकालानुसार एकूण १४३ मते मिळवत कैलास म्हात्रे यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वसई तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमधील सात जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यापैकी खार्डी-डोलीव, माजिवली-देपिवली आणि रानगाव या ग्रामपंचायतीमधील रिक्त जागांसाठी प्रत्येकी एक असे तीन अर्ज प्राप्त झाल्यामुळे येथील उमेदवार बिनविरोध निवडून आले.

तर शिरवली ग्रामपंचायतीतील दोन जागा आणि चंद्रपाडा ग्रामपंचायतीतील एका जागेसाठी एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नसल्यामुळे त्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. तर पाणजू ग्रामपंचायतीतील प्रभाग २ (अ) या जागेसाठी दोन अर्ज प्राप्त झाल्यामुळे मंगळवारी पाणजू गावातील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली.

ही निवडणूक बॅट चिन्ह असणारे कैलास म्हात्रे आणि शिट्टी हे चिन्ह असणारे नरेंद्र भोईर यांच्यात लढविण्यात आली. तर ३१५ मतदारांपैकी २६१ मतदारांनी यावेळी मतदान केले.

तर बुधवारी सकाळी तहसील कार्यालयात पार पडलेल्या नंतर निकाल जाहीर करण्यात आला. निकालानुसार कैलास म्हात्रे यांना एकूण १४३ मते, नरेंद्र भोईर यांना ११५ मते आणि नोटाला ३ मते मिळाली. त्यामुळे २८ इतके मताधिक्य मिळवत बॅट चिन्हावर निवडणूक लढवणारे कैलास म्हात्रे या निवडणुकीत विजयी ठरले आहेत.