वसई: पश्चिम, मध्य, आणि हार्बर मार्गावरील प्रवास सुलभ करण्यासाठी पनवेल – वसई उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी न मिळाल्यामुळे प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही.वसई विरारमधून पनवेल तसेच नवी मुंबई परिसरात नोकरी व व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, वसई-विरार, कर्जत-खोपोली या मार्गावर लोकलची संख्या कमी असल्याने चाकरमान्यांना मोठ्या गर्दीतून प्रवास करावा लागतो. तसेच काहींना मेमू गाड्यांवर अवलंबून राहावे लागते.

मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई शहरी परिवहन प्रकल्प अंतर्गत ६९.२ किलोमीटर लांबीचा पनवेल – वसई उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. सप्टेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने या प्रकल्पास मंजुरी दिली व त्यानंतर ३ ऑक्टोबर २०२५ रोजी हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. मात्र, रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पाला मंजुरी न मिळाल्यामुळे कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष काम सुरुवात होऊ शकलेली नाही.

याबाबत माजी नगरसेविका जोस्पीन फरगोज यांनी मुंबई रेल्वे विकास महामंडळ तसेच राज्य शासनाला निवेदन देत या प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली आहे. हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यास वसई-विरार, नालासोपारा, पालघर व बोरीवली परिसरातील नागरिकांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत थेट संपर्क मिळेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊन या परिसरातील उद्योग व रोजगाराला मोठी चालना मिळेल.तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही गर्दीपासून दिलासा मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होणे गरजेचे असल्याचे मत फरगोज यांनी व्यक्त केले आहे.