वसई: विरार पूर्व येथील पापडखिंड डोंगरावर ट्रेकिंगदरम्यान रस्ता भरकटल्यामुळे अडकलेल्या दोन तरुणांना पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या वाचवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राबवलेल्या या मोहिमेनंतर दोन्ही तरुणांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी येथे राहणारे जनक मगनलाल चुडासमा (३५) आणि धार्मिक मनसुखभाई चुडासमा (२४) हे सायंकाळी ५ च्या सुमारास पापडखिंड डोंगरावरील शंकर मंदिर परिसरात ट्रेकिंगसाठी गेले होते. मात्र, ट्रेकिंगवरून परतत असताना अचानक अंधार पडला. त्यातच सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्यांना खाली उतरण्याचा रस्ता सापडला नाही आणि ते डोंगरावरच अडकले.

डोंगरावर अडकल्यामुळे परिस्थिती गंभीर झाल्याचे लक्षात येताच दोन्ही तरुणांनी तातडीने आपले नातेवाईक भावीन योगेशभाई चावडा यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. चावडा यांनीही वेळ न गमावता ‘डायल ११२’ वर कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच फुलपाडा बीट मार्शलचे पथक तातडीने सतर्क झाले. पोलीस हवालदार नितीन उत्तेकर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कासार, जय मोरे, प्रदीप शिंदे आणि उत्कर्ष सोनवणे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ शोध मोहीम सुरू केली.

खराब हवामान आणि कठीण परिस्थितीचा सामना करत सुमारे २ किलोमीटर डोंगराळ भागात पायी चढाई करून दोन्ही तरुणांचा शोध घेतला. चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही तरुणांना शोधून काढण्यात आले आणि रात्री १० च्या सुमारास त्यांना सुरक्षितपणे डोंगरावरून खाली आणण्यात आले. यानंतर दोन्ही तरुणांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. विरार पोलिसांची तत्परता आणि या धाडसी बचाव मोहिमेचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.