वसई: पापडी परिसरातील राम मंदिरामागे असणाऱ्या बोंडळी तलावातून इमारत बांधकामासाठी विकासक विनापरवानगी पाणी उपसा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवत अवैध पाणी उपशाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वाढत्या उष्णतेमुळे वसईतील नैसर्गिक जलस्त्रोतातील पाणी आटत आहे. तर वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध जलसाठे नागरिकांसाठी अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे शहरातील भूजल पातळी टिकवणाऱ्या तलाव, विहिरी आणि बावखल यांसारख्या नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली. पण, असे असताना वसई पश्चिमेतील पापडी परिसरातील राम मंदिरामागे असणाऱ्या बोंडळी तलावातून विनापरवानगी पाणी उपसा केला जात असल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.
सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खानोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून पापडी परिसरात एका २२ मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीनुसार, इमारत बांधण्यासाठी विकासकाकडून जमिनीच्या खालून वाहिनी अंथरण्यात आली असून या वाहिनीद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या हा उपसा सुरू आहे.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खानोलकर, डॉमिनिका डाबरे आणि स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर सहायक आयुक्त संगीता घाडीगावकर आणि मंडळ अधिकारी सुनील राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर स्थानिकांच्या मागणीनुसार पाण्याचा उपसा करण्यासाठी वापरली जाणारी मोटार काढण्यात आली तसेच तलावाला जोडलेली वाहिनीसुद्धा कापून टाकण्यात आली.
याबाबत बोलताना, पापडीतील या प्रकरणाचा पंचनामा करून अहवाल तहसीलदारांना सादर केला जाईल व पुढील कारवाई केली जाईल असे, आश्वासन मंडळ अधिकारी सुनील राठोड यांनी दिले आहे. तर महापालिका हद्दीत सुरू असणाऱ्या या बेकायदा पाणी उपशाबाबत नगररचना विभागाला माहिती दिली जाईल, अशी प्रतिक्रिया सहायक आयुक्त संगीता घाडीगावकर यांनी दिली आहे.
