Passport office finally opened in Vasai Application facility 40 persons per day ysh 95 | Loksatta

वसईत अखेर पारपत्र कार्यालय सुरू; दिवसाला ४० जणांना अर्ज करण्याची सुविधा

मागील काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पारपत्र कार्यालय अखेर वसईतील एव्हरशाईन येथे सुरू करण्यात आले आहे.

वसईत अखेर पारपत्र कार्यालय सुरू; दिवसाला ४० जणांना अर्ज करण्याची सुविधा
(Photo-File Photo)

वसई : मागील काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पारपत्र कार्यालय अखेर वसईतील एव्हरशाईन येथे सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सद्य:स्थितीत या ठिकाणी दिवसाला ४० जण पारपत्रासाठी अर्ज दाखल करू शकतील, अशी सुविधा करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील नागरिक विदेशात फिरण्यासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी जात असतात. त्यासाठी पारपत्राची गरज भासते; परंतु जिल्ह्य़ात पारपत्र काढण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने ठाणे व मालाड येथे जावे लागत होते. त्यात वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाया जात असतात. शहरात स्वतंत्र पारपत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. याबाबत पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनीही पाठपुरावा सुरू केला होता.   या प्रसंगी राजेंद्र गावित यांच्यासह प्रादेशिक पारपत्र अधिकारी मुंबई डॉ. राजेश गवांडे, नवी मुंबई टपाल विभाग अधिकारी सुश्री सरन्या, पोलीस सहआयुक्त श्रीकांत पाठक, प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे, तहसीलदार उज्ज्वला भगत यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 01:25 IST
Next Story
विकासाच्या प्रकल्पात तीन हजार वृक्षांचे बळी