आदेश देऊनही रुग्णालयांकडून अतिरिक्त देयकांचा परतावा नाही; कारवाई  इशारा

प्रसेनजीत इंगळे
विरार :  करोनाकाळात वाढीव देयक आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करत पालिकेच्या लेखापरीक्षण समितीने अतिरिक्त देयकातील पैसे रुग्णांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. पण अजूनही अनेक रुग्णालयांनी कोटय़वधीची वाढीव देयक रुग्णांना परत केलेली नाही. यामुळे पालिकेने या रुग्णालयांना आता नोटीस  बजावण्यास सुरुवात केली आहे. मुदतीच्या आत रुग्णालयाने रुग्णांचे वाढीव देयकातील अतिरिक्त रक्कम परत न केल्यास त्यांचावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

करोना वैश्विक महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या दरम्यान ४२ करोना रुग्णालयातून १६०० वाढीव देयकाच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात पालिकेने कारवाई करत दोन कोटी ६७ लाख ९६ हजार २९४ रुपयांची देयक या रुग्णालयांना परत करायला सांगितली होती. पण अजूनही २१ रुग्णालयांनी एक कोटी ६३ लाख ५० हजार ४२० रुपयांची देयक परत केली नाहीत.

वसई-विरार परिसरात कोरना वैश्विक महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत काळात खासगी रुग्णालयांनी वाढीव देयक लावत करोना रुग्णाची लूट चालवली होती.     पालिकेच्या लेखा परीक्षण समितीने काम करत, रुग्णालयांना पालिकेने वाढीव रक्कम रुग्णांना परत करण्याचे आदेश दिले होते. पण अजूनही अनेक रुग्णालयांनी कोटय़वधीची रक्कम परत केलीच नाही. यामुळे आधीच आर्थिक फरफट सहन केलेले रुग्ण अधिकच अडचणीत आले आहेत.   करोना दुसऱ्या लाटेत मार्च आणि एप्रिल महिन्यात हाहाकार माजला होता. शहरात  अतिरिक्त पैसे मोजून रुग्णांना खाटा मिळवाव्या लागत होत्या. त्यात प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णालये प्राणवायूचे दाम दुप्पट पैसे आकारत होते. त्याचबरोबर औषधांचा भडिमार, उपचारांसाठी लागणारे इतर साहित्य,  विविध चाचण्या यांच्या नावाखाली रुग्णालये रुग्णाची लूट चालवली होती. या संदर्भात तक्रारी वाढल्याने पालिकेने   त्यांची चौकशी सुरू केली यात सर्व रुग्णालयांतून १६०० वाढीव देयकांची प्रकरणे आली त्यात १७ कोटी ८९ लाख ६४ हजार २१६ रुपयांची देयके प्राप्त झाली.

पुरस्कार विजेत्या विनायका रुग्णालयाची ४० लाखाची वाढीव देयके

नालासोपारा येथील वादग्रस्त विनायका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या करोना महामारीच्या काळात ४४ नागरिकांनी वाढीव देयकाच्या तक्रारी केल्या आहेत. यात एकूण ८१ लाख ६१ हजार १८२ रुपयांची देयक वाढीव असल्याचा आरोप होता. यात पालिकेच्या अहवालानंतर ४० लाख २ हजार ३३४ रुपयांची वाढीव देयक या रुग्णालयाने आकारली असल्याचे समोर आले. यात रुग्णालयाने ३४ लाख ६६ हजार ५०८ रुपयांची देयक रुग्णांना परत केली. तर अजूनही ५ लाख ३५ हजार ८२६ रुपयांची देयक रुग्णांना परत करणे बाकी आहे.

अतिरिक्त देयकांचे परतव्याचे पैसे परत न करणाऱ्या रुग्णालयांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. नोटिशीमध्ये दिलेल्या कालावधीत रुग्णालयांनी रुग्णाचे पैसे परत नाही केले तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल

— सुरेश बनसोडे, मुख्य लेखापरीक्षक, वसई-विरार महानगर पालिका