महापालिकेचे दुर्लक्ष; लसीकरणाबाबतही खबरदारी नाही

विरार :  कोरोना  दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना राज्य शासनाने टाळेबंदीचे निर्बंध शिथिल केल्याने वसई विरारमधील फेरीवाल्यांनी पुन्हा रस्त्यांवर कब्जा करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही पालिकेने करोनासंदर्भातील कारवाया बासनात गुंडाळल्या आहेत. यामुळे रस्त्यांवर पुन्हा फेरीवाल्यांचे साम्राज्य उभे राहत आहे. यात फेरीवाल्यांच्या लसीकरणाच्या बाबतीत कोणतीच तसदी पालिकेने घेत नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

पालिकेने स्वतंत्र्य दिनापासून रात्री १० वाजेपर्यंत दुकाने, हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. याचाच  गैरफायदा घेऊन फेरीवाल्यांनी रस्त्यावर दुकाने थाटात आहेत रात्री उशिरापर्यंत फेरीवाले रस्त्याच्या दुतर्फा आणि पदपाथ काबीज करून बसत आहेत. यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.  करोनाकाळात पालिका आणि पोलिसांनी  रेल्वे स्थानक व गर्दीच्या परिसरातील फेरीवाले हटवण्याची मोहीम सुरू असल्याने रस्ते फेरीवाला मुक्त होते. पण आता या मोहीम पालिकेनेच बासनात गुंडाळली असल्याने विरार पूर्व पश्चिम, नालासोपारा पूर्व आणि पश्चिम आणि वसई पूर्व पश्चिम रेल्वे स्थानकालगतचे परिसर फेरीवाल्यांनी व्यापले आहेत.  त्यामुळे प्रवासी व पादचाऱ्यांना रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग मिळत नसल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत.  रस्त्याशेजारील पदपाथ मोकळे ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश असले तरी पालिका मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. भाजीविक्रेते फळविक्रेते, कपडय़ांचे विक्रेते, पर्सविक्रेते पदपथावर ठाण मांडतात. मुख्यत्वे नालासोपारा स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा त्रास वाढत चालला आहे. या फेरीवाल्यांमुळे रेल्वे प्रवाशांना स्थानकाबाहेर पडणे आणि स्थानकापर्यंत पोहोचणे अत्यंत जिकिरीचे होत आहे. या स्थानकापासून अवघ्या १००  मीटर अंतरातच बस स्टँड आहे आणि रिक्षा स्टँडही आहे. येथूनच मनपा, एस टी, ट्रॅव्हल्स बसेस जातात. रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने व अवजड वाहनांच्या वर्दळीने या परिसरात नेहमीचा वाहतूक कोंडी होत असते. याशिवाय बस आगरातही फेरीवाले ठाण मांडत असल्याने नागरिकांना या स्थानक परिसरात चालणे पुन्हा मुश्कील होऊ लागले आहे.