वसई : नालासोपारा पूर्वेतील पेल्हार येथील साडी कंपाऊंड परिसरातील काही कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी प्रक्रियेविना थेट नाल्यात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रदूषणामुळे नाल्याचे पाणी पूर्णपणे दूषित झाले असून, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

​मागील काही वर्षांपासून नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार भागात औद्योगिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. या भागात अनेक छोटे-मोठे उद्योग आणि कारखाने कार्यरत आहेत. मात्र, त्यांपैकी काही कारखान्यांतील दूषित व रासायनिक सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट नाल्यात सोडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

​या प्रदूषणामुळे नाल्यातील जलचर, वनस्पती आणि संपूर्ण परिसरातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच रासायनिक पाण्यामुळे पसरणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ​स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातील वाढत्या प्रदूषणाबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून संबंधित दोषी कंपन्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांबाबत प्रशासन एवढे उदासीन का, असा सवाल संतप्त नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. ​महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित कंपन्यांची चौकशी करावी, नाल्यातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषी आढळणाऱ्या उद्योगांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.

तसेच भविष्यात अशा प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे. “महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आम्ही सातत्याने तक्रारी करत असतो. मात्र, प्रशासनाकडून या तक्रारींची योग्य दखल घेतली जात नाही व कारवाईत दिरंगाई केली जाते. याच हलगर्जीपणाचा फायदा घेत कारखानदार उघडपणे रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडून देत आहेत.” :- ब्रह्मदेव सिंह (भाजप युवा मोर्चा)

​प्रदूषणावर कारवाया सुरूच : प्रशासन

​वसई-विरार भागातील औद्योगिक क्षेत्रांत सांडपाण्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाया केल्या जात आहेत. वालीव, पेल्हार परिसरातील ३० पेक्षा अधिक कारखान्यांवर दूषित सांडपाणी सोडल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काठोळे यांनी दिली. तसेच, साडी कंपाऊंड येथील तक्रार प्राप्त झाली असून, त्या ठिकाणी तात्काळ पथक पाठवून पाहणी केली जाईल व दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.