विरार : सवलती आणि विविध माध्यमांतून आवाहने करूनसुद्धा नागरिक थकीत मालमत्ता कर भरत नसल्यामुळे वसई-विरार महापालिकेने सक्तीचा मार्ग अंवलंबला आहे. यात नागरिकांनी जानेवारी २०२३ पर्यंत कर न भरल्यास त्यांना दरमहा दोन टक्के दंड आकारला जाणार आहे. यामुळे नागरिकांनी तातडीने थकीत कर भरणा करावा असे पुन्हा एकदा आवाहन पालिकेने केले आहे.
आपले वार्षिक मालमत्ता कराचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिका वेगवेगळय़ा युक्त्या करत आहे. त्यात घोडय़ावर, रिक्षातून दवंडी देणे, पाच वर्षांच्या एकत्रित कराच्या भरनेवर काही सुट देणे यांचा समावेश आहे. परंतु तरीही नागरिक थकीत कर भरत नसल्याने अशा नागरिकांना पालिकेने लक्ष्य केले आहे. पालिकेचा मालमत्ता कर १ जानेवारी २०२३ पूर्वी कर भरण्याचे आवाहन केले आहे. जे नागरिक कर भरणार नाहीत त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका १९४१ अधिनियम अनुसूची ड प्रकरण ८ कराधान नियम ४१ अन्वये मालमत्ता कराचा पूर्ण भरणा करेपर्यंत प्रतिमहिना दोन टक्के दंड (शास्ती) आकारणी करण्याची तरतूद केली आहे.
पालिकेने या वर्षीचे ६४६ कोटी रुपयाचे मालमत्ता कराचे लक्ष ठेवले आहे. पालिकेने आतापर्यंत २१२ कोटी रुपये मालमत्ता कराचे पैसे वसूल केले आहेत. यामुळे ४३४ कोटी रुपये अजूनही पालिकेला वसुली करायची आहे. यामुळे पालिका कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळय़ा युक्त्या करत आहे.