वसई : वसई, विरार शहरात पाणीटंचाईअभावी नळजोडण्यांना स्थगिती असताना नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार प्रभागात पालिकेने नळ जोडण्या दिल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पालिकेने मात्र खासदारांच्या शिफारशीमुळे या नळजोडण्या दिल्याचे सांगून आपली बाजू सावरायचा प्रयत्न केला आहे. शहरातील इतर नळजोडण्यांना स्थगिती असताना या नळजोडण्या दिल्या कशा, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
वसई, विरार शहराला सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २३० दशलक्ष लिटर, पेल्हार धरणातून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर असा एकूण २३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. शहराला ३२६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ २२० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यातही पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे १५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्षात केवळ १९० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यामुळे मिळत असलेल्या पाण्यातूनही दररोज ४३ दशलक्ष लिटर्स पाणी कमी मिळत आहे. दुसरीकडे पाण्याची मागणी वाढत आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी विविध योजनांचे काम सुरू आहे. एमएमआरडीएतर्फे सूर्या प्रकल्पातून ४०३ दशलक्ष लिटर पाण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत वसई-विरार शहराला अतिरिक्त १८५ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. ते पाणी आले नसल्याने नवीन नळजोडण्यांना मार्च २०२१ पासून स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे पालिकेकडे नळजोडणीसाठी हजारो अर्ज प्रलंबित आहेत.
एकीकडे हजारो नळजोडण्या प्रलंबित असताना दुसरीकडे पालिकेने पेल्हार प्रभागात नळ जोडण्या दिल्याचे उघड झाले आहे. नळ जोडण्यांना स्थगिती असताना पालिकेने बेकायेदशीररीत्या या नळजोडण्या दिल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक मिलिंद घरत यांनी केला आहे. पालिकेने मात्र आम्ही खासदारांच्या शिफारीमुळे नळ जोडण्या दिल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे. पेल्हार भागात पाणीटंचाई होती. त्यामुळे खासदार राजेंद्र गावित यांनी त्या भागाचा दौरा केला आणि १५ ठिकाणी नळजोडण्या देण्याची शिफारस करणारे पत्र दिले. त्या पत्राला पालिका आयुक्तांपासून इतर सर्व अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आणि त्यानंतरच या नळजोडण्या दिल्या गेल्या असे पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले. कुठलीही नळजोडणी बेकायदेशीर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नळ जोडणी नसल्याने नागरिकांचे हाल
शहरात मोठय़ा प्रमाणात गृहनिर्माणाचे कार्य सुरू आहे. शेकडो इमारतींनी नव्या नळ जोडणीसाठी केलेले अर्ज पालिकेत धूळखात पडले असून त्यात नव्याने निर्माण झालेल्या इमारतींची अजूनही बिकट अस्वस्था आहे. त्यांना पाण्यासाठी पूर्णत: टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक गृहसंकुलांना महिन्याला केवळ पाण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. अजूनही शहरातील नव्या जल योजनेच्या जलवाहिन्यांचे जलकुंभांचे काम पूर्ण केलेले नसल्यामुळे नवीन नळजोडण्या देण्यास पालिकेने स्थगिती दिली आहे. पालिकेने २०१७ पासून सूर्याचे अतिरिक्त पाणी आल्यानंतर नळजोडणी देण्यास सुरुवात केली होती. तेव्हा पालिकेने सुमारे १४ हजार १९२ नळजोडण्या दिल्या होत्या. घरगुती नळ जोडण्या ३४३०२, व्यावसायिक ९९६, औद्योगिक २२८, शाळा १५०, मंदिर आणि धर्मशाळा १८७, अन्य ११९० या जोडण्यांचा समावेश आहे. सध्या पालिकेकेडे ३ हजारांहून अधिक नळजोडण्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.