scorecardresearch

वाहने धुण्यासाठी बेसुमार पाणी; अनधिकृत वाहनसफाई केंद्रांकडे पालिकेची डोळेझाक

वसईत अवैध वाहनसफाई केंद्र गाडय़ा धुण्यासाठी पाण्याचा भरमसाट वापर करतात. पण पालिकेचे त्याकडे लक्षच नाही. पालिका त्यांना कर लावत नाहीच पण पाण्याच्या नासाडीबद्दल कानही हलवत नाही.

विरार : वसईत अवैध वाहनसफाई केंद्र गाडय़ा धुण्यासाठी पाण्याचा भरमसाट वापर करतात. पण पालिकेचे त्याकडे लक्षच नाही. पालिका त्यांना कर लावत नाहीच पण पाण्याच्या नासाडीबद्दल कानही हलवत नाही. एकूण ‘अवैध वाहनसफाई केंद्रांनी पाणी वाया घालवले, पण पालिकेने नाही पाहिले’, अशी परिस्थिती आहे.
मागील काही दिवसांत वसई-विरारमधील वाहनसंख्या वाढत आहे. तसेच शहरात गॅरेज आणि वाहनसफाई केंद्र वाढत आहेत. या दुकानांनी पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली ही दुकाने रस्त्यावरील जागा व्यापतातच, पण बेकायदा पाणीही वापरतात. पालिकेला मात्र याची कल्पनाही नाही किंवा असूनही पालिका त्याकडे डोळेझाक करते. पालिकेकडे या दुकानांची नोंदणीच नसल्याने पाणीलाभ कर ते भरत नाहीत. त्यामुळे पालिकेचा कोटय़वधींचा महसूल बुडत आहे. तर दुसरीकडे नागरिक मात्र पाणीटंचाईने हैराण आहेत.
दुतर्फा वाहनदुरुस्ती आणि वाहनसफाई केंद्रांमुळे शहरातील प्रमुख रस्ते व्यापले आहेत. शहरात जवळपास दोन हजारांहून अधिक वाहनदुरुस्ती आणि वाहनसफाई केंद्र आहेत. यातील बहुतांश दुकानांची नोंदणी नाही, परवाना नाही. बांधकाम अवैध आहे. त्यामुळे घरपट्टी वा मीटर नाहीत. शिवाय येथे चोरीची वीज आणि पाणी सर्रास वापरले जाते.
रस्त्यावर वाहने धुणाऱ्या या वाहनसफाई केंद्रांमधील साबणाचे पाणी, इंजिन ऑईल, पेट्रोल, डिझेल, ग्रीस रस्त्यावर वाहत येते. त्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघाताचा धोका वाढतो. या निसरडय़ा रस्त्यांवरून दुचाकी घसरून काही अपघातही झाले आहेत. त्याविषयी तक्रारी नागरिकांनी पालिकेकडे केल्या असल्या तरी पालिका त्याकडे कानाडोळा करते आहे.
पाणीलाभ कर म्हणजे काय?
पाण्याचा व्यावसायिक वापर केल्याबद्दल पालिका पाणीलाभ कर आकारत असते. मात्र वाहनसफाई सेंटर पाण्याचा वाहने धुण्यासाठी सर्रास व्यावसायिक वापर करत असतानाही पालिकेला त्याचा गंध नाही. त्यामुळे पालिकेकडून कोणताच कर आकारला जात नाही. इतक्या वर्षांत या न आकारलेल्या करापोटी पालिकेचे कोटय़वधींचे नुकसान झालेले आहे. वाहनसफाई केंद्रे पाण्याचा बेकायदा आणि भरमसाट उपसा करत असल्याने भूजलपातळी खालावली आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Plenty water washing vehicles municipal corporation turns blind eye unauthorized vehicle cleaning centers amy

ताज्या बातम्या