विरार : मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दुतर्फा भरणीसाठी राडारोडा टाकून बेकायदा भरणी केली जात आहे. त्यामुळे आधीच वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला हा महामार्ग आणखी धोकादायक होत आहे. भूमाफियांनी महामार्गावरील जागा लाटण्यासाठी बांधकामाचा राडारोडा टाकून जागा लाटण्यास सुरूवात केली आहे.
यामुळे महामार्गवरील रस्ते धोकादायक बनत असून अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर ते विरार या परिसरात सर्वाधिक बेकायदा हॉटेल आणि ढाब्यांचे पीकच जणू आले आहे. यासाठी जागा समतल करण्यासाठी भूमाफिया वसई विरार तसेच मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या परिसरातून बांधकामाचा रारारोडा खरेदी करून रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने महामार्गालगत असलेल्या जानिमीवर भरणा करत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा राडारोडय़ाची भरणी केली जात असल्याने कचऱ्याचे मोठे ढीग तयार होत आहेत.
या महामार्गावर रात्रीच्यावेळी मुंबई, आसपासचा परिसर आणि औद्योगिक वसाहतीतून निघणारा कचरा बिनदिक्कत आणून त्याची भरणी केली जाते. भूमाफियांचा मोठा गट यासाठी काम करत असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. भूमाफिया अनेक ट्रकवाल्यांना हाताशी धरून रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे कचऱ्याची भरणी करतात. त्यानंतर त्यावर बेकायदा व्यापारी गाळे, इमारती, हॉटेल, धाबे, गॅरेज निर्माण केले जातात. हा राडारोडा रात्रीच्या वेळी टाकला जातो. त्यावेळी वाहतुकीच्या नियमांचेही उल्लंघन केले जाते. यामुळे इतर वाहनांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ही वाहने छुप्या पद्धतीने काम करतात. त्यामुळे त्यांचे दिवे बंद करून काम चालू असते. अंधारात इतर वाहनांना ती न दिसल्याने अपघात होत आहेत. अनेक वेळा भंगार वाहनांचाही यासाठी वापर केला जातो. रस्त्यावर मोठ मोठे दगड, रेती, धूळ, सिमेंट याचे तुकडे सांडलेले राहतात. त्यानेही अपघाताच्या घटना वाढतात.
अनेक ठिकाणी महामार्गावर काम सुरु असून रस्ता रुंदीकरणासाठी जागा सोडल्या आहेत. भूमाफिया तेथे राडारोडा टाकून बेकायदा भरणी करत आहेत. आणि तेथे आपले व्यवसाय थाटण्याचा प्रयत्न करत आहेत. या राडारोडा टाकण्यावर कारवाई करण्यास पालिकेने सुरूवात केली होती. परंतु करोनाकाळात ती बंद झाल्याने महामार्गावर राडारोडा टाकण्याचे काम परत जोमाने सुरू झाले आहे.