वसई : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम स्वनिधी’ (प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी) योजनेला ६ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत. या योजनेअंतर्गत वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत तब्बल ३४ हजार ७५ कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी ३१ हजार ९०६ लाभार्थ्यांना ४६ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.
पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी कर्जवाटप योजना सुरू करण्यात आली आहे. करोनाच्या संकटकाळात अनेकांच्या हातचे रोजगार निघून गेले होते. त्यानंतर छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत नाममात्र व्याजदरावर सुरवातीला १० हजार रुपये इतके कर्ज उपलब्ध करून दिले होते. जे व्यावसायिक या कर्जाची परतफेड करतील त्यांना २० हजार , ५० हजार असे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. हे कर्ज शहरातील राष्ट्रीयकृत बँका, मल्टिस्टेट बँका, को-ऑपरेटिव बँक अशा विविध बँका मधून कर्ज वितरण केले जात आहे. या योजनेची वसई विरार महापालिकेनेही अंमलबजावणी केली होती.
यात सहा वर्षात महापालिके मार्फत ३४ हजार ७५ इतक्या कर्ज प्रकरणांना मंजुरी दिली आहे. मंजूर कर्जाची रक्कम ही ५० कोटी २५ लाख इतकी आहे. तसेच, लाभार्थ्यांना ३१ हजार ९०६ कर्ज प्रकरणांद्वारे ४६ कोटी ४ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आली असून, या योजनेमुळे शहरातील पथविक्रेते व लघु व्यावसायिकांना आर्थिक बळ मिळाले आहे असा दावा महापालिकेने केला आहे.
