सुहास बिऱ्हाडे
वसई: मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वसई पश्चिमेच्या सनसिटी येथील २७ एकर एवढय़ा प्रशस्त जागेत हे मुख्यालय तयार होणार असून जागा हस्तांतरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मुख्यालयात पोलीस कवायती मैदानापासून विविध विभाग तयार केले जाणार आहेत.

ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे विभाजन करून १ ऑक्टोबर २०२० रोजी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. दोन जिल्ह्यांचे मिळून असणाऱ्या या पोलीस आयुक्तालयात सध्या १६ पोलीस ठाणी आहेत. आयुक्तालय कार्यालय मिरा रोड येथे आहे. मात्र पोलीस मुख्यालयासाठी जागा जागेचा शोध सुरू होता. आता हे मुख्यालय (हेड क्वॉर्टर) वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे तयार होणार आहे. जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात अंतिम टप्प्यात असून या आठवडय़ात जागा हस्तांतरित केली जाणार आहे. जागा हस्तांतरित झाल्यानंतर लगेचच पोलीस गृहनिर्माण मंडळातर्फे बांधकाम केले जाणार आहे. वसई सनसिटी परिसर मध्यवर्ती असल्याने सर्वासाठी ती सोयीस्कर असणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. मुख्यालय जरी वसईमध्ये असले तरी पोलीस आयुक्त कार्यालय हे मात्र मिरा रोड येथेच राहणार आहे.

आयुक्तालयाची रचना
पोलीस आयुक्तालयाची रचना ३ परिमंडळात करण्यात आली आहे. परिमंडळ १ मध्ये एक उपायुक्त असून त्यांच्या अखत्यारित उत्तन सागरी, भाईंदर, नवघर, मीरा रोड, नया नगर आणि काशिमिरा पोलीस ठाणी आहेत. तर परिमंडळ २ आणि ३ वसई विरार शहरात असून त्यांच्या अखत्यारीत अर्नाळा सागरी, वसई, माणिकपूर, वालीव, आचोळे, पेल्हार, नालासोपारा, विरार, तुळींज,मांडवी अशा एकूण १० पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.

मुख्यालय असे असेल
पोलीस मुख्यालयासाठी वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे २७ एकर जागा प्रस्तावित आहे. या मुख्यालयात प्रशासकीय इमारत, शस्त्रास्त्र विभाग, मोटार वाहतूक, आदी विविध विभाग असणार आहेत. याशिवाय दररोज होणारे पोलीस कवायत, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र, सराव केंद्र आदी असणार आहे. मुख्यालय हे पोलीस आयुक्तालयासाठी बॅकअप म्हणून कार्यरत राहणार आहे. त्यात गृहरक्षक (होमगार्डस), राज्य राखीव सुरक्षा बल ( एसआरपीएफ), दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात येणार आहे. शस्त्रागार विभागात पोलिसांना लागणारी हत्यारे आणि दारूगोळा ठेवला जाणार आहे. येथून तो सर्व पोलिसांना पुरविण्यात येणार आहे. पोलीस दलातील वाहनांचे वितरण, वाहनांची दुरुस्ती मोटर वाहन विभागात केली जाणार आहे. पोलिसांच्या शस्त्र सरावासाठी शूटिंग रेंज देखील तयार केले जाणार आहे.


वसईच्या सनसिटी येथील दिवाणमण गाव भूमापन क्रमांक ७६/१ या जागेवर पोलीस मुख्यालय उभारले जाणार असून जागा हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. – सदानंद दाते, पोलीस आयुक्त, मीरा -भाईंदर पोलीस आयुक्तालय.

ही जागा मध्यवर्ती असून सर्वासाठी सोयीस्कर असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा हस्तांतरित केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल – संजय पाटील, उपायुक्त, परिमंडळ- २

आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर दोन वर्षांच्या आतच मुख्यालयाचा प्रश्न सुटला आहे. यामुळे पोलीस दल खऱ्या अर्थाने परिपूर्ण होणार आहे – विजयकांत सागर, पोलीस उपायुक्त, मुख्यालय