वसई: वसई विरार शहरात जंगल परिसर यासह विविध ठिकाणच्या भागात छुप्या मार्गाने गावठी दारूच्या हात भट्ट्या लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. नुकताच विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाने विरार बरफपाडा येथे छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली आहे.

वसई विरार शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने जंगल परिसर व कांदळवन भागात दारूच्या हात भट्ट्या लावल्या जात आहेत. त्यातून निर्माण होणारी गावठी दारू ही विविध ठिकाणी वितरित केली जात आहे. दिवसेंदिवस गावठी दारू हातभट्टीचे अड्डे वाढत आहेत.अशा बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पथके नियुक्त केली आहेत.

नुकताच विरार पूर्व येथील बरफ पाडा, लहानगेपाडा समाज मंदिरा जवळील एका शेतात सुरु गावठी दारूची हातभट्टी लावण्यात आली होती. याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाला मिळाली होती.  माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी छापा  टाकून कारवाई केली आहे. कारवाई मध्ये १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात ३ हजार लीटर नवसागर गूळ मिश्रित रसायन, २५ लीटर गावठी दारू आणि ती तयार करण्याची साधने यांचा समावेश आहे.

या प्रकरणी एका महिला आरोपीच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ब) (क) (ड) (फ) (ई) प्रमाणे गुन्हा विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ही कारवाई  गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, संतोष मदने, शिवाजी पाटील, धनंजय चौधरी, संदीप शेरमाळ, सुप्रिया टीवले आदींच्या पथकाने केली आहे.

यापूर्वी हातभट्ट्यांवर करण्यात आलेली कारवाई

यापूर्वी मांडवी पोलिसांनी पारोळ आणि खार्डी कोशिंबे येथील जंगलात धाडी टाकून गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या होत्या. यात हजारो लीटर दारूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला होता. तर नायगाव पोलिसांनीही पाणजू बेटावर बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या गावठी हातभट्टीवर कारवाई केली होती. या कारवाईत १५० लीटर गावठी तयार दारु, १६२ ड्रम्समध्ये ३२ हजार ४०० लीटर वॉश, सत्तेले व इतर सामग्री असा १७ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.