वसई :  महावितरणाच्या भूमिगत वीजवाहक तारांचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या तनिष्का कांबळे प्रकरणात अखेर अर्नाळा सागरी पोलिसांनी १५ दिवसांनी महावितरण तसेच वसई विरार महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. अंतिम अहवालानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरारमध्ये राहणाऱ्या तनिष्का कांबळे या १५ वर्षीय शाळकरी मुलीला १६ ऑगस्ट रोजी महावितरणाच्या भूमिगत वीजवाहक तारेचा धक्का लागला होता. भूमिगत वीजवाहक तारांना गळती लागली होती आणि त्यातून वीजप्रवाह पाण्यात उतरला होता. या पाण्यात पाय पडल्याने तनिष्काला विजेचा जोरदार धक्का लागला आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी केवळ अपमृत्यूची नोंद केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युत अभियंत्याचा अहवाल आला नसल्याचे कारण देत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. या विलंबामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला होता.

याप्रकरणी परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर बुधवारी रात्री महावितरणाचे अधिकारी, ठेकेदार तसेच निष्काळजीपणे रस्ता खोदून केबल टाकणारे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०४ (अ) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा मोघम असून नेमके जबाबदार कोण यांची नावे का नाहीत, असा सवाल भाजपचे उपाध्यक्ष मनोज बारोट आणि जनता दलाचे राज्य सचिव मनवेल तुस्कानो यांनी केला आहे. जर एवढा मोघम गुन्हा दाखल करायचा होता तर विलंब का लावला, असा सवाल बारोट यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील. – प्रशांत वाघुंडे, पोलीस उपायु्क्त- परिमंडळ ३

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police registered case against mahavitaran after 15 days in tanishka kamble death case zws
First published on: 02-09-2022 at 00:57 IST