वसई:- वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात छुप्या मार्गाने गावठी दारूच्या हातभट्ट्या लावल्या जात आहे. नुकताच नायगाव पूर्वेच्या कामण परिसरातील जंगलात दोन ठिकाणी गावठी दारूच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली आहे. या कारवाईत ३ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वसई विरार मध्ये जंगल, डोंगर, कांदळवन क्षेत्र अशा विविध ठिकाणच्या भागात गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्ट्या लावण्यात येत आहेत. त्यातून तयार होणारी दारू विविध ठिकाणी वितरित केली जात आहे. दिवसेंदिवस गावठी दारू हातभट्टीचे अड्डे वाढत आहेत.अशा बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः अमली पदार्थ तस्करी, डान्सबार, गावठी दारूच्या हातभट्ट्यावर कारवाई करण्यात येत आहे.
नुकताच नायगाव पूर्वेच्या कामण बेलकडी जंगल परिसरात अवैधरीत्या गावठी दारू तयार करण्यासाठी हात भट्टी लावली जात असल्याची गुप्त माहिती नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत ३ लाख ६७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात ५५० लीटर गावठी दारू व रसायन आणि ती तयार करण्याची साधने यांचा समावेश आहे. या प्रकरणी दोन आरोपीच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ब) (क) (ड) (फ) (ई) प्रमाणे गुन्हा नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार शेखर पचार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, पोलीस अंमलदार चेतन ठाकरे, सचिन खंताळ, अमर पवार, अशोक पाटील, पांडुरंग महाले आदीच्या पथकाने केली आहे.

