वसई-विरार महापालिकेचा निर्णय; नाक्यांवरील अतिक्रमणे काढून नाना-नानी उद्यान, वाचनालये

वसई : वसई विरार शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी वसई विरार महापालिकेने सुरुवात केली आहे. याचा भाग म्हणून शहरातील तलावांचा विकास केला जाणार आहे तसेच शहराच्या नाक्यांवरील अतिक्रमणे हटवून तेथे नाना-नानी उद्याने, बालोद्याने, कट्टा आणि वाचनालये तयार केली जाणार आहेत. परिमंडळ १ मधील तीन प्रभागांमधून या कामांची सुरुवात होणार आहे.

वसई विरार महापालिकेच्या ९ प्रभागांची विभागणी ३ परिमंडळांत करण्यात आली आहे. परिमंडळ १ मध्ये प्रभाग समिती ‘सी’ चंदनासार (विरार पूर्व), प्रभाग समिती ‘अ’ बोळिंज (विरार पश्चिम) आणि नालासोपारा पूर्वकडील प्रभाग समिती ब यांचा समावेश होतो. या तीन प्रभागांत मिळून एकूण २० तलाव आहेत. मात्र या तलावांची दुरवस्था झालेली आहे. तलावांच्या बाहेर कचरा साठलेला आहे तसेच अतिक्रमणे झालेली आहेत. त्यामुळे तलाव परिसराला बकाल स्वरूप आले आहे. यासाठी या तलावांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याशिवाय शहरातील सौंदर्यात भर टाकण्यासाठी आणि अतिक्रमणे रोखण्यासाठी नाक्यांवरील अतिक्रमणे हटवून छोटी उद्याने तसेच वाचनालये विकसित केली जाणार आहेत.

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

याबाबत माहिती देताना महापालिकेच्या परिमंडळ-१ च्या प्रमुख नयना ससाणे यांनी सांगितले की, प्रत्येक शहराची एक ओळख असते. वसई विरार शहराला निसर्गसंपदा लाभली आहे. शहरात अनेक तलाव आहेत. मात्र त्यांचा विकास न झाल्याने या तलावांना डबक्यांचे स्वरूप आले आहे. अस्वच्छता आणि परिसरात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे या तलावांचे सुशोभीकरण करून शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही शहरातील ११ तलावांचे सर्वेक्षण केले असून पहिल्या टप्प्यात या तलावांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आल्याचेही उपायुक्त ससाणे यांनी सांगितले.

तलावांचे सुशोभीकरण असे

तलावांना नैसर्गिक पाण्याचे झरे असतात. ते मोकळे करून तलावांचे नैसर्गिक स्वरूप कायम ठेवले जाणार आहे. तलावाच्या सभोवताली चालण्यासाठी मार्गिका (जॉगिंग ट्रॅक) तयार केले जाणार आहेत. तलावासभोवताली उद्यान, बसण्यासाठी बाके, लहान मुलांना खेळण्याची साहित्ये बसवली जाणार आहेत. तलावासभोवतालची अतिक्रमणे काढली जाणार आहेत. यामुळे नागरिकांना तसेच लहान मुलांना तलावाच्या परिसरात शुद्ध हवेत फिरण्यासाठी चांगला जागा मिळू शकणार आहे.

शहरातील नाक्यांवरील अतिक्रमणे रोखणार

शहरातील ठिकठिकाणच्या मोक्याच्या जागांवरील नाक्यांवर वेगवेगळ्या प्रकारे अतिक्रमणे होत आहेत. त्यामुळे पालिकेने आता या जागा ताब्यात घेऊन त्यांचा विकास करण्याचे ठरवले आहे. या जागा मोकळ्या असल्याने त्यांचा गैरवापर होतो. त्यामुळे आम्ही अशा जागा शोधून त्यांचा चांगल्या कामासाठी वापर करता येईल का, यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती उपायुक्त नयना ससाणे यांनी दिली. या जागांवर नाना-नानी पार्क, ज्येष्ठांसाठी कट्टा, वाचनालये सुरू करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.