सिमेंट रस्त्यांची दुरवस्था

मीरा-भाईंदर शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांना अवघ्या वर्षभरात तडे व खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहेत.

आयआयटीच्या तांत्रिक शाखेच्या अहवालात पालिकेला अभय

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांना अवघ्या वर्षभरात तडे व खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाला असून पालिकेचे कोटय़वधी रुपये वाया गेल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर या नादुरुस्त रस्त्यांमुळे वाहतुकीची समस्या भेडसावत आहे.

महानगरपालिका क्षेत्रात वर्षभरापूर्वी नव्याने सिमेंट-काँक्रीट रस्तानिर्मितीचे काम करण्यात आले होते. मात्र त्याचबरोबर या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत होता. यात शहरातील आठ रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्यासाठी महापालिकेने सहा संस्थांना २०१९ मध्ये ठेका दिला होता.

यात काशी नगर, न्यू गोल्डन नेस्ट, दीपक रुग्णालय परिसर, प्लेजन्ट पार्क आणि नया नगर अशा मुख्य रहदारी असलेल्या भागाचा यात समावेश होता. मात्र हे काम नियोजित पद्धतीने होत नसून यात हलगर्जी होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे सिमेंट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. त्यावर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने कोकण विभागीय आयुक्तांना चौकशी करून एक महिन्याच्या आत शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

याच गोष्टीची दखल घेत मनपा आयुक्तांनी रस्त्याच्या कामाची आयआयटीच्या तांत्रिक शाखेकडून तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. काही महिन्याभरापूर्वी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्याची पाहणी आयआयटीच्या तांत्रिक शाखेकडून प्रत्यक्षात करण्यात आली होती. त्यानुसार आता या विभागाने अहवाल तयार केला असून प्रशासनाला सुपूर्द केला आहे. धक्कादायक म्हणजे या अहवालात काँक्रीटीकरणाच्या कामात कोणत्याही प्रकारचा घोळ नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ काही ठिकाणी तांत्रिक घोळ दिसल्याने त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुराव्यासह करण्यात आलेल्या तक्रारीनंतरदेखील आयआयटी विभागाला त्रुटी न मिळाल्यामुळे हे विभाग पालिका प्रशासनाला अभय देत असल्याची तक्रार होत आहे. तसेच आता अशाच रस्त्यांवर खड्डे आणि तडे गेले असल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले असल्याची तक्रार दिलीप भाबड यांनी प्रशासनाजवळ केली आहे.

तक्रार प्राप्त होणाऱ्या रस्त्याची पुन्हा पाहणी करण्यात येणार असून त्याची गरज पडल्यास दुरुस्ती करण्यात येईल.

– सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Poor condition cement roads ssh

ताज्या बातम्या